Thursday, February 12, 2026 03:24:25 AM

Sanjay Raut : 'अजित पवारांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र दु:खात; पण काही लोक 'टाळूवरचं लोणी' खाणारे..' संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत विचारले असता, राऊत यांनी सांगितले की, अजित पवार हयात असताना हे विलीनीकरण शक्य वाटत होते. पण आता..

sanjay raut  अजित पवारांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र दुखात पण काही लोक टाळूवरचं लोणी खाणारे संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका

Sanjay Raut on Deputy CM of Maharashtra : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य बदलांवर माध्यमांशी संवाद साधला. राऊत यांनी अजित पवार यांचा पुढील वारसदार आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीच्या चर्चेविषयी बोलताना आपल्या याविषयी माहिती नसल्याचे तसेच, दुखवटा संपेपर्यंत बोलू इच्छित नसल्याचे म्हटले आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव चर्चेत आहे. आज सायंकाळी 05:00 वाजता त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्राला नवीन महिला उपमुख्यमंत्री मिळत असल्याच्या बातम्या मी ऐकत आहे. मात्र, अजित पवारांच्या कुटुंबातील कोणाला उपमुख्यमंत्री करायचे हा निर्णय पूर्णपणे त्यांच्या पक्षाचा आणि भाजपचा आहे. याशिवाय, तो त्यांचा कौटुंबिक व राजकीय विषय आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

पक्षाचे विलीनीकरण आणि शरद पवारांची भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत विचारले असता, राऊत यांनी सांगितले की, अजित पवार हयात असताना हे विलीनीकरण शक्य वाटत होते. शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यात या संदर्भात चर्चा सुरू होती आणि 12 तारखेला त्याबाबत निर्णय होणार होता. मात्र, आता शरद पवारांनी आपल्याला उपमुख्यमंत्रीपदाबाबतच्या निर्णयाची काहीही माहिती नसल्याचे म्हटले आहे. तर, राऊत यांनी, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे भवितव्य आता पूर्णपणे भाजपच्या निर्णयावर अवलंबून आहे, असे म्हटले आहे.

भाजपवर 'मढ्याच्या टाळूवरचे लोणी' खाण्याचा आरोप
अजित पवारांच्या दुःखद निधनानंतर तातडीने राजकीय हालचाली सुरू करण्यावरून राऊतांनी भाजपवर अत्यंत जहरी टीका केली. "भारतीय जनता पक्ष हा मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारा पक्ष आहे," असे सांगत त्यांनी संताप व्यक्त केला महाराष्ट्रात अजित पवारांच्या जाण्याने अजूनही दुःखाचे वातावरण असताना सत्तेसाठी सुरू असलेली ही घाई अमानुष असल्याचे त्यांनी म्हटले. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतरही भाजपने शिवसेना गिळण्याची योजना आखली होती, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा - Sunetra Pawar: ‘दहावंही झालेलं नाही, मग एवढी घाई कशासाठी?’ सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, राष्ट्रवादीचं उत्तर

अमित शाह आणि सत्तेचे रिमोट कंट्रोल
शिंदे गट आणि अजित पवारांचा गट हे दोन्ही भाजपच्याच 'गर्भातून' आलेले आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. "हे दोन्ही पक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रातील प्रमुख घराणी आणि पक्ष फोडण्यासाठी निर्माण केले आहेत," असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. उपमुख्यमंत्रीपदाचा किंवा मंत्रिमंडळाचा कोणताही निर्णय प्रफुल पटेल किंवा सुनील तटकरे घेणार नसून, तो केवळ अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हेच ठरवतील, असेही त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्रातील शोककळा आणि राऊतांचा पवित्रा
अजित पवार हे महाराष्ट्राच्या घराघरातील चेहरा होते आणि त्यांच्या जाण्याने सामान्य जनता अजूनही सदम्यात आहे. जोपर्यंत हा दुखवटा संपत नाही, तोपर्यंत सविस्तर राजकीय भाष्य करणे टाळणार असल्याचे राऊत म्हणाले. पार्थ पवार यांना लोकसभेवर पाठवणे किंवा सुनेत्रा पवारांना मंत्रिमंडळात घेणे, हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न असला तरी राज्याच्या स्वाभिमानाशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी शेवटी दिला.

हेही वाचा - Parth Pawar Meet Sharad Pawar: बारामतीत चक्र फिरणार? पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला, कारण समोर


सम्बन्धित सामग्री