बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या घटनेला तीन आठवडे उलटूनही काही संशयित अद्याप फरारी आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारावर खुनाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या मागणीच्या पार्श्वभूमीवर, शनिवार (ता. २८) रोजी बीडमध्ये सर्व जातीय, सर्व पक्षीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चाच्या तयारीसाठी बीड जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, आणि निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी सुरक्षेच्या अनुषंगाने विशेष बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
मोर्चात दिवंगत देशमुख यांची मुलगी वैभवी, भाऊ धनंजय यांच्यासह मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर यांच्यासारखे अनेक नेते सहभागी होणार आहेत.