Satara Job Fraud Case : सरकारी नोकरीचे स्वप्न दाखवून साताऱ्यातील एका निष्पाप शेतकऱ्याला 1 कोटी 80 लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात हायप्रोफाईल व्यक्तींची नावे समोर आल्याने प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सप्टेंबर 2022 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत हा फसवणुकीचा खेळ सुरू होता. आरोपींनी संगनमत करून पवार यांचा विश्वास संपादन केला आणि सातारा, मुंबई, कोल्हापूरसह विविध शहरांमध्ये मिळून 1 कोटी 80 लाख रुपये उकळले.
वंदे भारत आणि PWD मध्ये नोकरीचे आमिष; बनावट मुलाखती आणि खोटी नियुक्तीपत्रे
साताऱ्यातील जावळी तालुक्यातील महीगाव येथील शेतकरी शैलेश काशीनाथ पवार यांच्या मुलाला भारत सरकारच्या 'वंदे भारत' ट्रेनमध्ये टीटीई पदावर आणि महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) नोकरी लावून देण्याचे आमिष आरोपींनी दाखवले होते. फसवणूक करणाऱ्या या रॅकेटने केवळ पैसेच घेतले नाहीत, तर पीडितांचा विश्वास बसण्यासाठी बनावट मुलाखतींचे आयोजनही केले होते. चक्क मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात या मुलाखती घेण्यात आल्या. इतकेच नाही तर सोलापूर आणि कोल्हापूरच्या जिल्हा रुग्णालयांत मुलांच्या खोट्या वैद्यकीय तपासण्या (Medical Test) करण्यात आल्या. शेवटी, रेल्वे आणि पीडब्ल्यूडीचे बनावट शिक्के असलेली नियुक्तीपत्रे त्यांच्या हातावर टेकवण्यात आली. प्रत्यक्षात या कागदपत्रांचा सरकारी विभागांशी कोणताही संबंध नसल्याचे नंतर उघड झाले.
हायप्रोफाईल आरोपींची नावे समोर
या प्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 26/2026 अंतर्गत मुंबईतील चेंबूरच्या माजी नगरसेविका शरीफा टाटा खान यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मंत्रालयातील कर्मचारी शामल मुखर्जी, रेल्वे अधिकारी आशिष अगरवाल, आणि पीडब्ल्यूडीचे सुधीर गायकवाड व किशोर माळी यांच्या नावांचा समावेश आहे. तसेच समीर चुंडमुंग, जहीर खान, निलेश ठाकूर आणि आनंद सिंग ऊर्फ बाबू शेठ या संशयितांविरुद्धही पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
हेही वाचा - Akola Crime : दुचाकीवरून आला अन् दोन शाळकरी मुलीच्या..., CCTV मध्ये 'तो' प्रकार कैद; अकोल्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मंत्रालयातील 'बाबू' आणि रेल्वे अधिकारी रडारवर
या रॅकेटमध्ये मंत्रालयातील आणि रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. आरोपींनी युपीआय (UPI), बँक ट्रान्सफर आणि रोख रकमेच्या माध्यमातून हे पैसे गोळा केले होते. मंत्रालयातील कर्मचारी आणि रेल्वे अधिकारी खरोखरच या रॅकेटमध्ये सहभागी होते की त्यांच्या नावाचा वापर करण्यात आला, याचा तपास आता पोलीस करत आहेत. या हायप्रोफाईल आरोपींच्या अटकेसाठी मेढा पोलिसांनी मुंबईत पथके पाठवण्याची तयारी केली आहे.
शेतकऱ्याचा संताप आणि पोलिसांचा इशारा
एका शेतकऱ्याची आयुष्यभराची पुंजी नोकरीच्या नावाखाली लुटली गेल्याने सातारा जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय नोकरीसाठी कोणत्याही एजंटला पैसे देऊ नका, कारण भरती प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक आणि अधिकृत पोर्टलद्वारेच केली जाते. अशा रॅकेटपासून सावध राहणे हाच फसवणूक टाळण्याचा एकमेव उपाय आहे.
हेही वाचा - Ahilyanagar Crime : अहिल्यानगरमध्ये दोन गटात गँगवॉर; जुन्या वादातून तुफान राडा, तर गोळीबारात एकाचा मृत्यू