Saturday, February 08, 2025 03:17:47 PM

Minister Dadaji Bhuse Mission
शालेय शिक्षण विभागाच्या योजना मिशन मोडवर राबवाव्यात

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश 

 शालेय शिक्षण विभागाच्या योजना मिशन मोडवर राबवाव्यात

मुंबई : शालेय शिक्षण विभागाकडील योजना आणि उपक्रम मिशन मोडवर राबवावेत, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत दिले. यामध्ये १०० दिवसांचा कार्यक्रम, नवीन शैक्षणिक धोरण आणि आरटीआयची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.

शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत मंत्री भुसे यांनी मंत्रालयातील समिती सभागृहात विभागाचा आढावा घेतला. यावेळी प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री भुसे म्हणाले, "केंद्र शासनाने जाहीर केलेले नवीन शैक्षणिक धोरण राज्यात प्रभावीपणे राबविताना सर्व शाळांना त्याची पूर्वसूचना द्यावी. यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण संबंधितांना देण्यात यावे. अभिनव प्रयोगांच्या माध्यमातून शालेय शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण करणे आवश्यक आहे. शिक्षणाच्या गुणवत्ता, सुधारणा आणि भविष्यकालीन धोरणांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. शिक्षकांच्या कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी अधिक प्रशिक्षण कार्यक्रमांची अंमलबजावणी करावी."

👉👉 हे देखील वाचा : अटल सेतूची यशस्वी प्रवासाची वर्षपूर्ती

ते पुढे म्हणाले, "दहावी आणि बारावी परीक्षा कॉपी मुक्त व्हाव्यात हे शिक्षण विभागाचे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहणे आवश्यक आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कॉपीपासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन करावे आणि त्यांना कॉपी मुक्त परीक्षा देण्यासाठी प्रेरित करावे. यासाठी आवश्यक ते सर्व उपाययोजना कराव्यात."

शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या कामकाजासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर जोर दिला. तसेच शाळांमध्ये पाणी, शौचालय, स्वच्छता, आणि क्रीडासुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एका शाळेला भेट दिली पाहिजे आणि त्या भेटीचा अहवाल विभागास सादर करावा, अशी सूचना दिली.

पीएमश्री शाळा योजनेच्या धर्तीवर सीएमश्री शाळा योजना राबविण्याची घोषणा करताना मंत्री भुसे म्हणाले, "या योजनेनुसार, तालुकास्तरावर किमान एक आदर्श शाळा असावी. त्या शाळेत ग्रंथालय, लॅब, क्रीडा विभागासाठी आवश्यक साधने असावीत. ही शाळा डिजिटल सुविधांनी परिपूर्ण असावी."

शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी जर्मनी देशात कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी चालविणाऱ्या योजनेला गती देण्याच्या सूचना दिल्या आणि या योजनेच्या अंमलबजावणीसाठी संबंधितांना पत्रव्यवहार करण्याचे निर्देश दिले.

बैठकीत विद्यार्थ्यांचे शिक्षण, शिक्षकांची क्षमता, शाळांच्या सुविधांची स्थिती, विविध योजनांची अंमलबजावणी, विद्यार्थ्यांना देण्यात येणारा पोषण आहार, शालेय अभ्यासक्रमाशी निगडीत बाबी, शाळाबाह्य मुलांचे सर्व्हेक्षण, शिष्यवृत्ती योजना, पवित्र पोर्टल, संचार मान्यता, शाळा व्यवस्थापन यासह विभागाकडील विविध योजना व उपक्रमांची माहिती घेऊन संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या.


👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
 


सम्बन्धित सामग्री