Shaktipeeth Mahamarg : राज्यातील महत्त्वाकांक्षी आणि चर्चेत असलेल्या 'शक्तिपीठ महामार्गा'बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ठिकठिकाणी होणाऱ्या विरोधामुळे या महामार्गाच्या आराखड्यात मोठे फेरबदल करण्यात आले असून, आता हा मार्ग सातारा जिल्ह्यातून जाणार आहे. विशेष म्हणजे, या बदलामुळे सातारा जिल्ह्यातील माण आणि खटाव या दोन दुष्काळी तालुक्यांतील 16 गावांचे नशीब उजळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन गतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले असून, काही दिवसांत नवीन अधिसूचनी निघण्याची शक्यता आहे.
मार्ग बदलला, आता 'या' गावांमधून होणार प्रवास
शक्तिपीठ महामार्ग पूर्वी सोलापूरमधून थेट सांगलीत जाणार होता. मात्र, कोल्हापूर आणि सांगलीतील काही भागांतून होणाऱ्या विरोधामुळे प्रशासनाने मार्ग बदलून तो सातारा जिल्ह्यात वळवला आहे. नव्या आराखड्यानुसार, हा मार्ग सोलापूर जिल्ह्यातील गारवडमधून साताऱ्याच्या कारखेलमध्ये प्रवेश करेल. माण तालुक्यातील 10 आणि खटाव तालुक्यातील 6 अशा एकूण 16 गावांतून हा महामार्ग जाणार आहे. सातारा जिल्हा ओलांडल्यानंतर हा मार्ग सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात प्रवेश करेल. यामुळे साताऱ्याचा हा पूर्व भाग आता थेट कोकण आणि विदर्भाशी जोडला जाईल.
हेही वाचा - Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर दहा दिवसांचा ब्लॉक, वाहतुकीला बसणार फटका,कोणते मार्ग असतील बंद?
साताऱ्यातील 'ही' 16 गावे येणार नकाशावर
महामार्गाच्या नवीन प्रस्तावात समाविष्ट असलेल्या संभाव्य गावांची नावे आता समोर येत आहेत..
माण तालुका: कारखेल, पर्यंती, खडकी, वरकुटे-म्हसवड, वाकी, दिवड, धामणी, गटेवाडी, वडजल आणि कुकुडवाड.
खटाव तालुका: कान्हरवाडी, हिवरवाडी, पडळ, कानकात्रे, अनफळे आणि मायणी. मायणीच्या पक्षी अभयारण्याजवळून हा मार्ग जाणार असल्याने या भागातील पर्यटनालाही मोठी उभारी मिळण्याची शक्यता आहे.
जरी प्रशासनाने अधिकृतपणे अद्याप गुप्तता पाळली असली, तरी हालचाली मात्र अत्यंत वेगवान आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. साधारणतः 3 वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या महामार्गामुळे प्रवासाचा वेळ वाचण्यासोबतच सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेलाही गती मिळणार आहे.
धार्मिक पर्यटनाची हौस असलेल्यांची चांदी
या महामार्गाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत. वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होणारा हा 802 किलोमीटरचा महामार्ग पत्रादेवी (कोकण) पर्यंत जाणार आहे. आता यात माण तालुक्यातील प्रसिद्ध शिखर शिंगणापूर आणि गोंदवले बुद्रुक ही दोन मोठी देवस्थाने आता या महामार्गाच्या जवळ येणार आहेत. नवीन अंदाजानुसार, महामार्ग गोंदवलेपासून केवळ 15 किलोमीटर आणि शिखर शिंगणापूरपासून 45 किलोमीटर अंतरावरून जाणार आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या बदलाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले असून, यामुळे भाविकांना जलद प्रवास करणे शक्य होईल.
हेही वाचा - Pune Railway Station : पुणे रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार; विमानतळाप्रमाणेच मिळणार 'या' खास सुविधा