ढाका : बांगलादेशमध्ये दबाव टाकून शेख हसीनांच्या समर्थकांचे राजीनामे घेतले जात आहेत. याआधी दंगल करुन आणि शेख हसीना यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करुन त्यांना देश सोडण्यास भाग पाडले. बांगलादेश सोडताना शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिला असे बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी जाहीर केले. यानंतर बांगलादेशमध्ये दबाव सत्र सुरू झाले.
शेख हसीना यांच्या सरकारने नियुक्त केलेल्या महत्त्वाच्या पदावरील सरकारी अधिकाऱ्यांचे राजीनामे घेतले जात आहेत. राजीनामा द्या नाही तर मरा अशा धमक्या देऊन राजीनामे घेतले जात आहेत. बांगलादेशचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन आणि सर्वोच्च न्यायालयातील निवडक न्यायाधीशांनी दबावासमोर झुकून राजीनामा दिला. यानंतर सय्यद रेफात अहमद यांना नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ देण्यात आली. सरन्यायाधीश बदलण्यात आल्यानंतर बांगलादेशच्या मध्यवर्ती बँकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यास सुरुवात झाली. दबाव असह्य झाल्यामुळे बांगलादेशच्या मध्यवर्ती बँकेचे प्रमुख अब्दुर रौफ तालुकदार आणि चार उपप्रमुख यांनी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यापासून अब्दुर रौफ तालुकदार संपर्कक्षेत्राच्या बाहेर आहेत.