नवी दिल्ली : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाची चर्चा होती. महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा नवा चेहरा कोण असणार याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. महायुतीची गुरूवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपाचा मुख्यमंत्री असेल असे जाहीर केले आणि बैठकीत भाजपाचा मुख्यमंत्री असेल यावर एकमत झाले. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीसांना पुष्पगुच्छ दिल्याचा फोटो समोर येत आहे.
देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या एक्स या सोशल मीडियावर अमित शाह यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. दिल्लीतील बैठकीनंतर फडणवीसांनी हे फोटो सोशल मीडियावर अकांऊटवर टाकले आहेत. या फोटोमध्ये अमित शाह यांनी फडणवीसांना पुष्षगुच्छ दिला आहे. त्यावेळी एकनाथ शिंदेंचा चेहरा पडलेला आणि नजर शून्यात दिसत आहे दुसरीकडे शाह आणि फडणवीस आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची देहबोली काही वेगळंच सांगून जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील बैठक सकारात्मक झाली असल्याचे माध्यमांना सांगितले आहे. आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. आज महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली आहे. महायुतीत समन्वय आहे. सर्व निर्णय एकमताने होणार आहेत. मी काळजीवाहू मुख्यमंत्री सगळ्यांची काळजी घेणार आहे. सख्खा भाऊ, माझं नवं पद नवी ओळख असे म्हणत शिंदेंनी सूचक वक्तव्य केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असल्याचे दिसत होते. मात्र भाजपाला बहुमत असल्याने मुख्यमंत्री हा भाजपाचाच असेल अशा चर्चा होत्या. गुरूवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री भाजपाचाच असेल हे जवळपास ठरले आहे. परंतु पक्षश्रेष्ठींकडून किंवा महायुतीकडून मुख्यमंत्री पदाबाबत अधिकृत जाहीर केले नाही.