मुंबई : विमानात प्रवाशांचे आदरातिथ्य करण्यासाठी हवाई सुंदरी असते. अगदी तशाच पद्धतीने मुंबई - पुणे मार्गावर धावणाऱ्या ई - शिवनेरी बसमध्ये प्रवाशांचे आदरातिथ्य करण्यासाठी शिवनेरी सुंदरी नियुक्त केली जाणार आहे. प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता चांगली सेवा देण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे, असे राज्य परिवहन महामंडळाचे अर्थात एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले म्हणाले. ते महामंडळाच्या संचालकांच्या ३०४ व्या बैठकीत बोलत होते. एसटीच्या ३४३ बस स्थानकांवर 'आनंद आरोग्य केंद्र' दवाखाना सुरू केला जाईल. माफक दरात विविध आरोग्य चाचण्या आणि औषधे एकाच छताखाली मिळतील. एसटीच्या प्रत्येक बस स्थानकावर त्या परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थविक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन १०X१० आकाराचा स्टॉल उपलब्ध करुन दिला जाईल; असेही भरत गोगावले म्हणाले.