छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकींच्या रणधुमाळीत नवी मुंबईमध्ये भाजप नेते गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यावर वारंवार निशाणा साधला. त्यांना वेळोवेळी आव्हानं दिली. मात्र निवडणुकीनंतर आता सर्वकाही आलबेल असल्याचंही गणेश नाईक यांनी स्पष्ट केलं. परंतू पुन्हा एकदा गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा वाद उफाळून आला आहे. त्यांच्या विरोधातील वक्तव्यांना शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी उत्तर दिले आहे. संजय शिरसाट म्हणाले की, गणेश नाईक यांचे थोडे जास्त होत आहे. दरवेळेला आव्हानाची भाषा करणाऱ्याने थोडं डोकं ठिकाणावर ठेवायला हवे. एकनाथ शिंदेसाहेबांमुळे सत्तेत आले आहेत. एवढं विसरू नका. साफ करण्याची भाषा कुणाला करत आहात?, हे काय नवी मुंबईचे डोंगर आहेत का, साफ व्हायला? की तेथील रेतीची खदाने आहेत, साफ व्हायला. आम्ही हिमतीने आणि जिद्दीने उभे राहणारे लोक आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तुम्हाला काय आदेश घ्यायचे ते तुम्ही घ्या, मात्र वारंवार बोलून तुम्हाला असं वाटत असेल की, आम्ही काहीतरी आहोत तर ही समजण्याची चूक करू नका. आम्ही ऐकतो याचा अर्थ असा होत नाही की, आम्हाला काही कळत नाही, महायुतीचा धर्म आम्ही पाळायचा आणि तुम्ही बोलायचं? हे आता सहन होणार नाही. मी सुद्धा मुख्यमंत्रीसाहेबांना बोलणार आहे, हे दरवेळीचे चाललं आहे. आम्ही साफ करून टाकू, आम्ही उखडून टाकू, आम्ही ते फेकून देऊ, कुणासाठी ही भाषा करत आहात तुम्ही. आम्ही जो काही त्याग केला त्याच्यामुळे ही सत्ता दिसते आहे आज. एकनाथ शिंदे साहेबांना एकदम हलक्यात घेण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. तुमची एवढीच ताकद असेल तर सांगून टाका देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि घेऊन टाका जो निर्णय तुम्हाला जो घ्यायचा आहे तो. हीच भाषा जर आम्ही केली तर महायुतीमध्ये मिठाचा खडा असं होइल. त्यामुळे एखाद्या नेत्याबद्दल बोलताना थोडंसं भान ठेवायला हवे.
हेही वाचा : Jyoti Waghmare vs Ganesh Naik : नाईकांची शिंदेंवरील टीका जिव्हारी, ज्योती वाघमारेंनी थेट औकात काढली