छत्रपती संभाजीनगर : भारत पारतंत्र्यात असताना स्वातंत्र्य हे जीवन मूल्य होते आता स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे हा समाज एकरस करायचा असेल तर समरसता हे मूल्य जपण्याची गरज आहे; असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय पूर्व सेवाकार्य प्रमुख सुहास हिरेमठ म्हणाले. ते छत्रपती संभाजीनगर येथील विवेकानंद केंद्र आयोजित 'शोधू चिंतनाचे रंगी' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. व्यवसायाच्या वर्गवारीने जाती निर्माण झाल्या पण तोच फार मोठा दुर्गुण आपल्या समाजाला लागला. गेल्या हजार वर्षांचा हा काळा डाग धुवून काढायचा असेल तर समरस समाज निर्मितीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. तो फक्त एकमेकांच्या सहज स्नेहबंधनातूनच दूर होऊ शकतो; असेही सुहास हिरेमठ म्हणाले.
याप्रसंगी बोलताना, 'मराठी वाचनाची आवड भाषेला वैभवाकडे मार्गक्रमण करण्यास मदत करेल', असे वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. महेश खरात म्हणाले. ते 'शोधू चिंतनाचे रंगी' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. पुस्तकातील विविध लेख हे अशाच व्यासंगाचे एकत्रित सादरीकरण आहे. तात्कालिक आणि प्रासंगिक दृष्टांतांनी यातील लेखांचे लिखाण केले आहे. वाचकांना याचा निश्चित अनुभव येईल. त्यामुळे अशी पुस्तके आपल्या संग्रही ठेवली पाहिजे आणि सर्वांनी ठरवून त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे; असेही ते म्हणाले.
विवेकानंद केंद्र पुणे, मराठी विभाग सचिव आणि ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांनी केंद्राची भूमिका मांडली. केंद्राच्या वतीने इंग्रजीसह जवळजवळ बारा भाषांमध्ये पुस्तकांचे प्रकाशन होते. येत्या काही दिवसांत शोधू चिंतनाचे रंगी सह अरुण रंग, तेजोमय नक्षत्र आणि हसरी पुष्प या पुस्तकांचेही प्रकाशन होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तर भोवतालच्या घटना नोंदवत गेलो आणि हे पुस्तक घडले असे 'शोधू चिंतनाचे रंगी' या पुस्तकाचे लेखक सुहास वैद्य म्हणाले.