मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सिद्धिविनायक मंदिर 5 दिवस भाविकांसाठी बंद असणार आहे. मुंबईचे सिद्धिविनायक येथे भाविक नेहमीच दर्शनासाठी येत असतात मात्र आता दि. 11 डिसेंबर ते रविवार दि. 15 डिसेंबर पर्यंत सिद्धिविनायक मंदिर बंद असणार आहे. दरवर्षी माघ श्रीगणेश जयंतीपूर्वी ‘श्रीं’चे सिंदूर लेपन केले जाते. या काळात भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर बंद ठेवले जाते.
प्रभादेवी परिसरातील सिद्धिविनायक मंदिरात बुधवार, दि. 11 डिसेंबर ते रविवार दि. 15 डिसेंबर या कालावधित श्री सिद्धिविनायकाचे सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात मंदिरातील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद राहणार आहे. परंतु, भाविकांना गाभाऱ्या बाहेरून श्रींच्या प्रतिमूर्तीचे दर्शन दिले जाईल. या काळात मंदिरातील सर्व नित्य धार्मिक कार्यक्रम नेहमीच्या वेळेवर सुरू राहतील, अशी माहिती देण्यात आली आहे.
काय आहे सिद्धिविनायक मंदिराची वैशिष्ट्ये?
श्री सिद्धिविनायक मंदिर हे भगवान श्री गणेशाला समर्पित हिंदू मंदिर आहे. हे प्रभादेवी, मुंबई येथे आहे. हे मूळतः मुंबई शहरातील सोमवंशी क्षत्रिय ययाती राजाच्या क्षत्रियकुळातील म्हणजेच सध्याच्या आगरी समाजातील लक्ष्मण विठू आणि देउबाई पाटील यांनी 19 नोव्हेंबर 1801 रोजी बांधले होते. हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे.
मंदिरात गर्भगृहाच्या लाकडी दरवाजांवर अष्टविनायकाच्या (महाराष्ट्रातील गणेशाची आठ रूपे) प्रतिमा कोरलेल्या आहेत. गर्भगृहाच्या आतील छतावर सोन्याचा मुलामा चढलेला असून मध्यवर्ती गणेशाची मूर्ती आहे. परिसरात हनुमानाचे मंदिरही आहे. मंदिराच्या बाह्यभागात घुमट आहे जो संध्याकाळी अनेक रंगांनी उजळतो आणि ते रंग दर काही तासांनी बदलत राहतात. घुमटाच्या अगदी खाली श्री गणेशाची मूर्ती आहे. खांबांवर अष्टविनायकाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.
महत्त्व आणि स्थिती
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सिद्धिविनायक मंदिर एका लहान मंदिरापासून आजच्या भव्य मंदिरात विकसित झाले. सिद्धिविनायक भक्तांमध्ये "नवसाचा गणपती" किंवा "नवसाला पावनारा गणपती" म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिर प्रशासनाकडून विविध प्रकारची पूजा करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरम्यान दि. 11 डिसेंबर ते रविवार दि. 15 डिसेंबर पर्यंत सिद्धिविनायक मंदिर बंद असणार आहे. दरवर्षी माघ श्रीगणेश जयंतीपूर्वी ‘श्रीं’चे सिंदूर लेपन केले जाते. या काळात भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर बंद ठेवले जाते.