Sindhudurg ZP News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, भारतीय जनता पक्षाने आपला 'बिनविरोध पॅटर्न' यशस्वी करून दाखवला आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असले तरी, कणकवली मतदारसंघात नितेश राणे यांच्या रणनीतीमुळे निवडणुकीपूर्वीच विजयाची माळ भाजपच्या गळ्यात पडली आहे.
ठाकरे गटाच्या उमेदवारांनी एकापाठोपाठ एक माघार घेतल्याने भाजप आणि महायुतीचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कणकवली तालुक्यात तर सलग दुसऱ्या दिवशी ठाकरे सेनेला भगदाड पाडत भाजपने अनेक जागा बिनविरोध खिशात घातल्या आहेत.
बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची यादी
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या विविध गटांतून बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
जिल्हा परिषद गट (भाजप/महायुती):
1. खारेपाटण: प्राची देवानंद इसवलकर (भाजप)
2. बांदा: प्रमोद कामत (भाजप)
3. जाणवली: रुहिता राजेश तांबे (शिवसेना-शिंदे गट)
4. पडेल: सुयोगी रवींद्र घाडी (भाजप)
5. बापर्डे: अवनी अमोल तेली (भाजप)
पंचायत समिती गण (भाजप):
1. वरवडे: राजेश ऊर्फ सोनू सावंत
2. कोकिसरे (वैभववाडी): साधना सुधीर नकाशे
3. बिडवाडी: संजना संतोष राणे
4. पडेल (देवगड): अंकुश यशवंत ठूकरूल
5. नाडण (देवगड): गणेश सदाशिव राणे
6. बापर्डे (देवगड): संजना संजय लाड
हेही वाचा - Vikas Gogawale : महाडमधलं मारहाण प्रकरण, विकास गोगावले अखेर पोलिसांना शरण
ठाकरे गटाची पीछेहाट आणि अर्ज बाद होण्याचे सत्र
कणकवली तालुक्यात ठाकरे गटाच्या गडाला सुरुंग लागला असून, त्यांच्या उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतल्याने भाजपचा मार्ग मोकळा झाला.
- खारेपाटणमधून ठाकरे सेनेच्या मीनल तळगावकर यांनी माघार घेतली, तर जाणवलीमध्ये रुहिता तांबे यांच्या विरोधातील हेलन कांबळे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली.
- बिडवाडी पंचायत समितीमध्ये तर ठाकरे गटाला तांत्रिक फटका बसला; येथील उमेदवार विद्या विजय शिंदे यांचा अर्ज 3 अपत्ये असल्याच्या कारणावरून छाननीमध्ये अवैध ठरवण्यात आला. यामुळे भाजपच्या संजना राणे यांचा विजय सुकर झाला.
- वरवडेमध्येही मनसे आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने सोनू सावंत बिनविरोध निवडून आले.
राणेंचा करिष्मा आणि कोकणातील राजकीय समीकरणे
कणकवली मतदारसंघात एकूण 4 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे.
- वैभववाडीच्या कोकिसरे गणात कोणताही विरोधी उमेदवार न आल्याने साधना नकाशे यांनी बाजी मारली. नितेश राणे यांनी या निवडणुकीत थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान देत कोकण हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
- ओटव गावच्या सरपंच रुहिता तांबे आणि खारेपाटणच्या सरपंच प्राची इसवलकर यांच्या रूपाने स्थानिक नेतृत्वाला जिल्हा परिषदेत मोठी संधी मिळाली आहे. या विजयामुळे येणाऱ्या 5 फेब्रुवारीच्या मतदानापूर्वीच महायुतीने जिल्ह्यात आघाडी घेतल्यामुळे महायुतीचा आत्मविश्वास दुणावला आहे.
हेही वाचा - Dombivli News : "परप्रांतीयांना अभय आणि मलाच त्रास का?" 'त्या' मराठी तरुणीचे केडीएमसीवर गंभीर आरोप