धाराशिव - महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री खंडोबा आणि बाणाई यांच्या विवाह सोहळ्यावर आधारित एक नवे गीत नुकतेच प्रसारीत झाले आहे. "नळदुर्ग नगरी हळदीने माखली " असे या गीताचे सुरेख बोल असून, हे गीत गीतकार-पत्रकार सुनील ढेपे यांनी लिहिले आहे. या गीताला प्रसिद्ध संगीतकार सचिन अवघडे यांनी संगीतबद्ध केले असून, गायक संदीप रोकडे यांनी ते आपल्या सुमधुर आवाजात गायले आहे.
श्री खंडोबा हे महादेवाचा अवतार मानले जातात आणि महाराष्ट्रात त्यांची ८ प्रमुख स्थाने आहेत. त्यापैकी अणदूर-मैलारपूर (नळदुर्ग) हे एक अत्यंत महत्त्वाचे स्थान म्हणून ओळखले जाते. दमयंती राणीच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्री खंडोबा नळदुर्ग येथे प्रकट झाले, तसेच दमयंती राणीच्या भक्तीमुळे खंडोबाने आपला दुसरा विवाह बाणाईशी या ठिकाणी केल्याची आख्यायिका आहे.
असे म्हणतात की खंडोबा-बाणाई यांच्या विवाह सोहळ्याला स्वतः ब्रह्मा, विष्णू, लक्ष्मी, सरस्वती, श्री गणेश यांच्यासह तब्बल ३३ कोटी देव उपस्थित होते! या विवाह सोहळ्यात नारद मुनींनी अक्षता म्हटल्या होत्या.
हे नवे गीत खंडोबा आणि बाणाई यांच्या या अलौकिक विवाह सोहळ्याचे सुरेख वर्णन करते. "नळदुर्ग नगरी हळदीने माखली, खंडोबा झालाय पिवळा, बाणाई - खंडोबाच्या लग्नाला, तेहतीस कोटी देव झाले गोळा" अशा ओळींमधून या गीतातून त्यांच्या विवाहाचे चित्र रेखाटले आहे. हे गीत भाविकांमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत आहे आणि खंडोबाच्या भक्तीचा एक नवा आयाम निर्माण करत आहे.