Thursday, February 12, 2026 11:58:06 PM

आता सर्व काही नियमानुसारच! 55 प्रवाशांच्या वर बसमध्ये 'नो एन्ट्री'; एसटी चालकवाहकांचं अनोख आंदोलन

एसटी बसमध्ये 90 ते 100 प्रवाशांची वाहतूक करीत असतानासुद्धा नागरिकांकडून होणाऱ्या खोट्या तक्रारींविरोधात शेगावातील चालकवाहकांनी अनोखे आंदोलन केले.

आता सर्व काही नियमानुसारच 55  प्रवाशांच्या वर बसमध्ये नो एन्ट्री एसटी चालकवाहकांचं अनोख आंदोलन

प्रफुल खंदारे, प्रतिनिधी

बुलढाणा : साधारण 55 प्रवाशांची क्षमता असलेल्या एसटी बसमध्ये 90 ते 100 प्रवाशांची वाहतूक करीत असताना सुद्धा नागरिकांकडून होणाऱ्या खोट्या तक्रारींविरोधात शेगावातील चालकवाहकांनी बुधवारी अनोखे आंदोलन केले. आता सर्व काही नियमानुसारच होणार, म्हणून प्रवासी क्षमता 55 अधिक एक एवढीच असल्याने यापेक्षा एकही प्रवासी बसमध्ये नेणार नसल्याची भूमिका घेतल्याने एकच खळबळ उडाली.

शेगाव एसटी आगारामध्ये आधीच एसटी बसेसची कमतरता असून या बसस्थानकावर राज्यभरातील प्रवासी श्रींच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे येथील एसटी आगाराचे उत्पन्न बऱ्यापैकी आहे. दरम्यान, शेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील काही गावांमध्ये विद्यार्थ्यांकरीता एसटी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र शेवटच्या स्टॉपपर्यंतचे विद्यार्थी आणि प्रवासी बसमध्ये चढत असताना अनेक प्रवासी व विद्यार्थी खालीच राहतात. असे विद्यार्थी व प्रवासी नेहमीच चालकवाहकांच्या तक्रारी वरिष्ठांकडे करतात. तर वरिष्ठ अधिकारी कुठलीही शहानिशा न करता चालकवाहकांना जाब विचारतात. यामुळे त्रस्त होऊन चालकवाहकांनी शेगावच्या बसस्थानकात अनोखे आंदोलन करून आजपासून 55 प्रवाशांपेक्षा एकही अधिकचा प्रवासी एसटी बसमध्ये घेणार नसल्याचा पवित्रा घेत शेगाव ते जळगाव आणि शेगाव ते पातुर्डा या बसमधून जादाचे प्रवासी खाली उतरवून देण्यात आले, अशी माहिती एसटी बस वाहक महेश बुरुंगले यांनी दिली. 

हेही वाचा : Mahapalika Mayor Aarakshan : राजकीय पक्षांची धाकधूक वाढली!; आज राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदाची आरक्षणाची सोडत

एसटी महामंडळाकडून बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश आगारांना प्रत्येकी 10 नवीन बसेस देण्यात आले. यामध्ये शेगाव आगाराला बसेसची जास्त आवश्यकता असतानासुद्धा फक्त आठ बसेस देण्यात आल्या. तेही सर्वात शेवटी. विशेष म्हणजे या आगारातील नवीन शिवशाही बसेस या मलकापूर आगाराला पाठवण्यात आल्या. तसेच जिल्हाभरातील नादुरुस्त असलेल्या जुन्या भंगार शिवशाही बसेस या शेगाव आगाराला देण्यात आल्या. ज्या बसेस आजही आगारामध्ये भंगार अवस्थेत उभ्या आहेत. त्यामुळे संत नगरीच्या एसटी आगाराशी असा भेदभाव का ?, असा प्रश्न चालकवाहक विचारत आहेत, असे एसटी बस चालक जमीर देशमुख म्हणाले. 


सम्बन्धित सामग्री