Thursday, September 12, 2024 10:36:34 AM

Mumbai
'उत्तर मुंबईतील रखडलेले प्रकल्प मार्गी लावणार'

अधिकाऱ्यांसोबत झालेल्या संयुक्त बैठकीमध्ये मुंबईतील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासंदर्भात तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी निर्णय घेण्यात आले.

उत्तर मुंबईतील रखडलेले प्रकल्प मार्गी लावणार

मुंबई : मुंबई महानगरपालिका, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, म्हाडा आणि एमएमआरडीए च्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या संयुक्त बैठकीमध्ये उत्तर मुंबई आणि मुंबईतील रखडलेले विविध प्रकल्प कामे मार्गी लावण्यासंदर्भात तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी निर्णय घेण्यात आले. ही माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी दिली. 

कांदिवली येथे ३७ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याबाबतचा प्रकल्प वेगाने मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. याठिकाणी भविष्यात आशियाई, राष्ट्रीय, राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक स्तरावरचे खेळाडू प्रशिक्षित केले जातील; असे गोयल म्हणाले. उत्तर मुंबई आणि उर्वरित मुंबईमध्ये अर्धवट आणि रखडलेले विविध प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून युद्धस्तरावर काम करत आहे.बोरिवली येथील बाळासाहेब ठाकरे उद्यान आणि प्रमोद महाजन क्रीडा संकुल यांच्या सर्वांगीण विकासासाठी विस्तृत चर्चा करून त्याबाबत अहवाल लवकरच सादर करून तेथे क्रीडा सुविधा केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खेळाडूंच्या उज्वल भविष्यासाठी असे प्रकल्प महत्वाचे असून ते पूर्ण करण्यासाठी वेगाने कामे सुरू आहेत असेही गोयल म्हणाले. 

कांदिवली येथील कौशल्य विकास केंद्र येत्या दोन महिन्यांत आणि शिंपोली येथील कौशल्य विकास केंद्र येत्या आठ महिन्यांत कार्यरत होईल. बहुविद्याशाखीय केंद्रांमुळे पालघरपर्यंतच्या रहिवाशांना लाभ होणार आहे; असे गोयल यांनी सांगितले. आकुर्ली पश्चिम द्रुतगती महामार्गावरील भूमिगत रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करण्याबाबत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांत काम करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती गोयल यांनी दिली.  वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी टाटा कंपनीला वाहतूक व्यवस्थापन आराखडा बनवण्याची विनंती केली असल्याची माहिती गोयल यांनी दिली.


सम्बन्धित सामग्री