Tuesday, May 20, 2025 02:52:26 PM

बैलानं धूम स्टाईलमध्ये चालवली स्कूटर; पहिल्याच 'टेस्ट ड्राईव्ह'चा व्हिडिओ व्हायरल

सर्व ठीक आहे, असे वाटत असतानाच, रस्त्याने शांतपणे जाणाऱ्या बैलाने यू-टर्न घेतला, आणि... सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या मजेदार क्षणात एक बैल रस्त्यावर धूम स्टाईलने स्कूटर चालवत असल्याचे दिसत आहे.

बैलानं धूम स्टाईलमध्ये चालवली स्कूटर पहिल्याच टेस्ट ड्राईव्हचा व्हिडिओ व्हायरल

ऋषिकेश : उत्तराखंडमधील ऋषिकेश हे ठिकाण आध्यात्मिक वातावरण आणि निसर्गरम्य टेकड्यांसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, इथे एक विचित्र प्रकार घडला. ऋषिकेशमध्ये एका भटक्या बैलाने पार्क केलेली स्कूटर जोरात ढकलत नेल्याची घटना घडली आहे. खरं तर याचा व्हिडिओ पाहताना बैल स्कूटर चालवत असल्याचा 'फील' येतो.

तसं पाहिलं तर आजूबाजूला लोक असते, तर गंमतशीर वाटणारी हीच घटना भयंकर वाटली असती. पण जणू काही मोकळा रस्ता आणि स्कूटरचा मालक आजूबाजूला नसल्याचं पाहूनच या बैलाने त्याच्या पहिल्या 'टेस्ट ड्राईव्ह'चा आनंद घेतला.

हेही वाचा - 'कर भला तो हो भला;' उघडे मॅनहोल ठीक करणाऱ्या व्यक्तीसोबत घडला चमत्कार!

एका भटक्या बैलाने पार्क केलेल्या स्कूटरवर पुढचे दोन पाय ठेवले आणि काही कळायच्या आतच ती स्कूटर बैलाच्या वजनामुळे आणि पुढे ढकलली गेल्यामुळे वेगाने पुढे घसरत जाऊ लागली. अशातच बैलाला स्वतःचे पाय काढून घेता आले नाहीत. त्यामुळे त्यालाही तेवढ्याच वेगाने स्कूटरच्या मागे जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. हा बैल स्वतःच्या मागच्या पायांनी थांबायचा आणि तोल सावरायचा प्रयत्न करत होता. पण त्याच्या या प्रयत्नांमुळे स्कूटरची चाकांना अधिक वेग मिळत होता. यामुळे स्कूटरला आणि त्याला पुढे जातच रहावे लागले.

सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या मजेदार क्षणात उत्तराखंडमधील ऋषिकेशमधील एका शांत रस्त्यावर एका पांढऱ्या स्कूटरजवळून एक बैल चालत असल्याचे दिसत आहे. पण सर्व ठीक आहे असे वाटत असतानाच, बैलाने यू-टर्न घेतला, मागे सरकला आणि त्याचे पुढचे पाय सीटवर जोराने टेकवले. त्यानंतर स्कूटरच्या टायर्सना पुढे जाण्यासाठी पुश मिळाला. नशीबाने या वेळी रस्त्यावर गर्दी नव्हती. त्यामुळे ही स्थिती सीसीटीव्ही फुटेजमध्ये गंमतशीर वाटत आहे. असा प्रकार गर्दीच्या ठिकाणी झाला असता तर अपघात होण्याची किंवा कोणतरी जखमी होण्याची पूर्ण शक्यता होती.

हा विचित्र प्रकार घडण्याच्या अगदी काही सेकंद आधी एक महिला स्कूटरजवळूनच तिच्या लहान मुलीला घेऊन चालत निघालेली सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. हे दोघे अगदी काही सेकंदांच्या फरकाने बचावले आणि पुढे निघून गेले. या महिलेने बैलाचा काही वेगळाच मूड आहे, हे लक्षात येताच तिच्या मुलीला उचलून घेतले आणि ती पुढे निघून गेली.

ती मागे वळली तोपर्यंत, बैलाने त्याची टेस्ट राईड पूर्ण केली होती. ती स्कूटर एका दुकानासमोर जाऊन कशाला तरी धडकून थांबली. तेव्हा स्कूटर आणि बैल दोघांचीही एकमेकांपासून सुटका झाली. या प्रकाराने स्वतःही भांबावलेला बैल इकडे-तिकडे पाहत निघून गेला. व्हायरल व्हिडिओ लवकरच अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोहोचला आणि व्हायरल झाला. लोक या बैलाच्या टेस्ट ड्राईव्हला दाद देत आहेत.

हेही वाचा - जगातील सर्वांत महागडं विमानतळ, इथे एका केळाची किंमत आहे 500 रुपये! गगनाला भिडलेत दर

“हेवी ड्रायव्हर,” असे एका वापरकर्त्याने म्हटले. प्रकारात स्कूटर ज्या ठिकाणी पार्क केलेली होती, तिथे न राहता, त्या जागेपासून पुढे निघून गेली. यावर दुसऱ्या युजरने म्हटले की, “स्कूटरच्या मालकाला कसं सांगायचं की ही चोरी माणसाने केलेली नाही?” “शिंगांचा वापर करून धूम,” असे आणखी एका वापरकर्त्याने म्हटले. दुसऱ्याने पुढे म्हटले, “भावाने टेस्ट ड्राईव्ह घेतली. तो ती स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असेल.” या चार पायांच्या स्कूटर‘स्वारा’मुळे  बैलांच्या बाबतीत आणखी एका वैशिष्ट्याची नोंद झाली आहे.


सम्बन्धित सामग्री