Rohit Pawar Tweet: राज्याच्या राजकारणात 28 जानेवारी रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर मोठी पोकळी निर्माण झाली होती. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पक्षाची सूत्रे आणि उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कोण सांभाळणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर अवघ्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडींनी राज्याच्या राजकारणाला नवा वळण दिलं आहे.
30 जानेवारीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हालचालींना वेग आला. अखेर अजित पवार यांचे पुत्र पार्थ आणि जय यांच्या पाठिंब्यानंतर त्यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास होकार दिला. त्यानंतर 31 जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारपदाचा राजीनामा दिला. पक्षातील बैठकीत एकमताने त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली.
यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला. शपथविधीनंतर सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या, ही बाब राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक मानली जात आहे.
या संपूर्ण घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा देताना, अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. “अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, पण सुनेत्राकाकींच्या रुपात तरी आम्हाला त्यांची झलक पाहायला मिळेल,” असे त्यांनी नमूद केले.
डोक्यावर दुःखाचा डोंगर असताना शुभेच्छा कशा द्याव्यात, हा प्रश्न पडल्याचंही रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये व्यक्त केलं. त्यांच्या या भावनिक शब्दांनी कार्यकर्त्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत अनेकांच्या भावना व्यक्त झाल्याचं चित्र आहे. राज्याच्या राजकारणात पुढील काळात सुनेत्रा पवार कशी भूमिका बजावतात, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.