Sunetra Pawar Elected NCP Legislative Party Leader : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली. राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्या आज सायंकाळी 5.30 वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत. राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.
गटनेतेपदासाठी कुणी मांडला प्रस्ताव?
विधान भवनात आज दुपारी 02:00 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव गटनेतेपदासाठी मांडला. या प्रस्तावाला दुसरे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. यानंतर सर्व उपस्थित आमदारांनी एकमताने सुनेत्रा पवार यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळण्यासाठी सुनेत्रा पवार यांचंच नाव योग्य असल्याचे मत नेत्यांनी व्यक्त केले.
राजभवनात आज सायंकाळी शपथविधी
गटनेतेपदी निवड झाल्यानंतर आता सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी 05:00 वाजता राजभवनातील 'लोकभवन' हॉलमध्ये हा सोहळा पार पडेल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. अजित पवारांच्या निधनामुळे निर्माण झालेला दुखवटा लक्षात घेता, हा सोहळा अत्यंत साधेपणाने आणि केवळ 10 ते 15 मिनिटांच्या कालावधीत पूर्ण केला जाणार आहे.
या बैठकीआधी देवगिरी बंगल्यावर पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर बोलताना सुनील तटकरे यांनी म्हटले होते की, राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत जनतेची भावना लक्षात घेता गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड होईल. त्यानंतर विधिमंडळ राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत पत्र प्रदेशाध्यक्ष म्हणून ते देण्यासाठी आम्ही वरिष्ठ सहकारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ. त्यानंतर मुख्यमंत्री निर्णय घेतील.
हेही वाचा - Supriya Sule: सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला सुप्रिया सुळेंची दांडी? समोर आली मोठी अपडेट
सुनेत्रा पवार यांच्या माहेरीही राजकारणाचा वारसा
सुनेत्रा पवार यांना त्यांच्या माहेरकडूनही राजकारणाचा वारसा लाभला आहे. त्यांचे वडील बाजीराव पाटील हे धाराशिव जिल्ह्यातील तेर गावचे महत्त्वाचे नेते होते. त्यांचे बंधू पद्मसिंह पाटील हे राज्याचे माजी गृहमंत्री बनले होते. शरद पवार यांच्यासोबत त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. सुनेत्रा पवार यांच्या निवडीमुळे त्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी राजमान होणाऱ्या पहिल्या महिला नेता ठरतील.
पार्थ आणि जय पवार कोणत्या भूमिकेत?
अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी बारामतीमध्ये राहून सांत्वनासाठी येणाऱ्या लोकांच्या भेटी घेण्याचे ठरवले आहे. तर धाकटे चिरंजीव जय पवार हे आई सुनेत्रा पवार यांच्यासोबत गटनेता निवड आणि शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईत उपस्थित आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर खचून न जाता पक्षाला पुन्हा उभारी देण्याचे मोठे आव्हान सुनेत्रा पवार यांच्यासमोर असणार आहे.
हेही वाचा - Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री पदासोबत सुनेत्रा पवारांच्या पदरी कोणती खाती? जाणून घ्या सविस्तरपणे