Sunil Shetty: बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी पुन्हा चर्चेत आला आहे. परंतु यावेळी त्याचे चित्रपट नव्हेत तर व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे उल्लंघन कारण ठरले आहे. अभिनेत्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्याच्या फोटो आणि नावाचा परवानगीशिवाय वापर रोखण्याची मागणी केली आहे. सुनील शेट्टीच्या वकिलांनी सांगितले की, काही जुगार आणि ज्योतिष प्लॅटफॉर्म्सवर अभिनेता आणि त्याच्या नातीचे फोटो परवानगीशिवाय पोस्ट केले जात आहेत. याशिवाय, काही व्यक्तींनी डीपफेक फोटो तयार करून त्यांचा गैरवापर केला आहे. तसेच त्यांच्या प्रतिमेचा वापर करून विविध वस्तू विकल्या जात आहेत. या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश आरिफ एस. डॉक्टर यांच्या समोर शुक्रवारी झाली. दरम्यान, न्यायालयाने तात्पुरता आदेश देण्याची शक्यता व्यक्त केली आहे, जेणेकरून अभिनेता आणि त्यांच्या नातीच्या प्रतिमेचा परवानगीशिवाय होणाऱ्या वापरा थांबवता येऊ शकेल.
हेही वाचा - Jhund Actor Death: नागपूर हादरलं! ‘झुंड’ चित्रपटातील अभिनेता प्रियांशू उर्फ बाबू छेत्री याचा निर्घृण खून
अभिनेत्याच्या वकिलाने असेही म्हटले आहे की, सोशल मीडियावर त्यांच्या नावाने अनेक बनावट अकाउंट तयार करण्यात आले आहेत. केवळ सुनील शेट्टीच नाही तर अनेक बॉलिवूड स्टार्सनीही अशा प्रकरणांमध्ये कारवाई केली आहे. या यादीत अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, अभिषेक बच्चन, करण जोहर आणि आशा भोसले सारख्या स्टार्सचा समावेश आहे. यापूर्वी आशा भोसले यांनी एआय प्लॅटफॉर्म्सद्वारे त्यांच्या आवाजाचे आणि शैलीचे अनुकरण केल्याबद्दल न्यायालयात धाव घेतली होती.
हेही वाचा - Arbaaz & Shura Khan Baby Name :अरबाज आणि शूरा खानच्या बाळाचं नाव जाहीर; खान कुटुंबात आनंद साजरा
दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी 2022 मध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी याचिका दाखल केली होती. करण जोहरनेही त्याच्या नावाचा, प्रतिमेचा गैरवापर केल्याचा आरोप करत खटला दाखल केला होता. अनिल कपूर यांनी 2023 मध्ये त्यांच्या प्रसिद्धी आणि व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी खटला दाखल केला होता. ऐश्वर्या राय यांनीही कारवाई केली आहे. याशिवाय अभिषेक बच्चनने त्याचे नाव, आवाज आणि फोटोंचा गैरवापर केल्याचा आरोप करत खटला दाखल केला. जॅकी श्रॉफनेही 2024 मध्ये परवानगीशिवाय आवाज, संवाद आणि फोटोंचा गैरवापर केल्याचा आरोप करत खटला दाखल केला होता.