Revati Sule Marriage : खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पवार आणि सुळे कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. या बातमीने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या आनंदाच्या बातमीचा 'गौप्यस्फोट' सुप्रिया सुळे यांच्या जवळच्या मैत्रिणीने, म्हणजेच माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांनी इंस्टाग्राम पोस्टद्वारे केला. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला. रेवतीचा भाऊ विजय सुळे यानेही आपल्या बहिणीसाठी भावुक पोस्ट लिहित शुभेच्छा दिल्या आहेत.
कोण आहे सुप्रिया सुळेंचा होणारा 'जावई'?
रेवती सुळे यांचा विवाह नागपूरचे उद्योजक सारंग अरुण लखानी (Sarang Arun Lakhani) यांच्याशी ठरला आहे. सारंग हे नागपूरमधील प्रसिद्ध 'विश्वराज ग्रुप'चे अध्यक्ष अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. सारंग यांनी अमेरिकेतील कोलंबिया बिझनेस स्कूलमधून MBA चे शिक्षण पूर्ण केले असून ते सध्या आपल्या कौटुंबिक व्यवसायात कार्यरत आहेत. केवळ व्यावसायिकच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही सारंग यांचे नाव मोठे आहे; त्यांनी बॅडमिंटनमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
हेही वाचा - Sharad Pawar Health Updates: पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस; सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची अपडेट
राजकीय मध्यस्थीची चर्चा
या लग्नाची सर्वात मोठी चर्चा म्हणजे हे नाते जमवण्यासाठी कोणाचे प्रयत्न कारणीभूत ठरले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या सोयरिकीत महत्त्वाची मध्यस्थी केली आहे. लखानी आणि गडकरी कुटुंबाचे जुने स्नेहसंबंध असल्याने, राजकीय मतभेद बाजूला ठेवून या दिगग्ज नेत्यांनी पवार आणि लखानी कुटुंबियांना एकत्र आणले आहे. यामुळे रेवती सुळे आता विदर्भाची, पर्यायाने 'नागपूरची सून' होणार आहेत.
रेवती सुळे यांची शैक्षणिक पार्श्वभूमी
रेवती सुळे या शरद पवार यांच्या नात असून त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) या प्रतिष्ठित संस्थेतून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. त्या थेट राजकारणात सक्रिय नसल्या तरी, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपली आई सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामती मतदारसंघात जोरदार प्रचार केला होता. आता एका प्रतिष्ठित उद्योगपती कुटुंबाशी त्यांचे नाते जोडले गेल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. लग्नाची तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नसली तरी, लवकरच हा शाही विवाह सोहळा पार पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी अजित पवारांसोबतचा ''तो'' सेल्फी केला शेअर ; कॅप्शनमध्ये लिहिलं ‘थॅंक्यू…’