अहमदाबाद : गुजरातमधील सुरत येथे एक धक्कादायक आणि अमानुष घटना समोर आली आहे. येथे 26 वर्षीय युवकाला चाकूच्या धाकावर दुसऱ्या व्यक्तीच्या पायाला चाटायला आणि माफी मागायला भाग पाडण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यात आरोपीला ‘भोला भाई’ या नावाने ओळखले जात आहे. पीडित युवक मूळचा मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यातील असून, तो सुरतमधील एका ढाब्यावर काम करत होता. ढाब्यावर काम करत असताना त्याचा आरोपी ‘भोला भाई’ सोबत वाद झाला आणि त्यातून ही घटना घडली.
दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब त्याच्या सीधी जिल्ह्यातील कुटुंबाच्या निदर्शनास आली. त्यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी ठरला. अखेरीस कुटुंबाने बहरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आपल्या मुलाचा शोध घेण्याची आणि त्याच्या सुरक्षिततेची मागणी केली. मध्य प्रदेश पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली आणि अखेर युवक पुण्यात असल्याचे आढळले. चौकशीत समजले की, भीतीपोटी तो पुण्यातील एका मित्राकडे गेला होता. पोलिसांनी त्याला सुरक्षित परत आणले आहे.
हेही वाचा: ED Action on Anil Ambani: रिलायन्स पॉवरच्या फसव्या बँक हमी घोटाळ्यात ED ची तिसरी अटक; काय आहे नेमकं प्रकरण?
व्हिडिओमध्ये पीडित युवक “भोला भाई, मला माफ करा, मी पुन्हा कधीच सुरतमध्ये येणार नाही” असे म्हणताना दिसतो. त्या वेळी आरोपी भोला भाई त्याच्या गळ्याजवळ चाकू धरून उभा होता. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आरोपीने त्याला अनेकदा चापट्या मारल्या, केस ओढले आणि पाय चाटायला भाग पाडले. तो सतत धमक्या देत असल्याचेही दिसते. ही घटना घडल्यानंतर पीडित युवक अचानक बेपत्ता झाला. तो दोन दिवसांपूर्वी ढाबा सोडून गेला होता आणि आपल्या मालकाला सांगितले होते की, तो पुण्यात मित्राला भेटायला जात आहे. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला आणि त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही.
सध्या या घटनेची सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली असून, युवकाचे जबाब नोंदवल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीची ओळख पटवून त्याला लवकरच अटक केली जाईल.
हेही वाचा: CERT-In Warning: लाखो अँड्रॉइड युजर्सवर मोठं संकट! 'हे' अपडेट लगेच करा नाहीतर वाढेल धोका