Thursday, July 17, 2025 02:45:12 AM

शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत सस्पेन्स वाढला; आता 'या' रिपोर्टमधून उलगडणार मृत्यूचे रहस्य

शवविच्छेदनानंतर डॉक्टरांनी त्यांचा अहवाल सुरक्षित ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. कूपर हॉस्पिटलच्या पाच फॉरेन्सिक डॉक्टरांच्या पथकाने पोस्टमार्टम केले. परंतु, अद्याप शेफालीचा अहवाल समोर आलेला नाही.

शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत सस्पेन्स वाढला आता या रिपोर्टमधून उलगडणार मृत्यूचे रहस्य
Edited Image

मुंबई: 'काटा लगा गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शेफालीच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोस्टमार्टमनंतरही डॉक्टरांना अभिनेत्रीच्या मृत्यूचे कारण काय होते याबद्दल निष्कर्ष काढता आलेला नाही. शवविच्छेदनानंतर डॉक्टरांनी त्यांचा अहवाल सुरक्षित ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. कूपर हॉस्पिटलच्या पाच फॉरेन्सिक डॉक्टरांच्या पथकाने पोस्टमार्टम केले. परंतु, अद्याप शेफालीचा अहवाल समोर आलेला नाही. त्यांनी पोस्टमार्टम हिस्टोलॉजीसाठी नमुने पाठवले आहेत.

शेफाली जरीवालाच्या मृत्यूचे कारण - 

प्राप्त माहितीनुसार, डॉक्टरांनी संरक्षित व्हिसेरा रासायनिक विश्लेषणासाठी कलिना फॉरेन्सिक सायन्स लॅब (FSL) मध्ये पाठवला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हिस्टोपॅथॉलॉजी फक्त अशा प्रकरणांमध्ये केली जाते जिथे पोस्टमार्टमनंतरही मृत्यूचे कारण स्पष्ट होत नाही आणि व्हिसेरा रासायनिक विश्लेषणासाठी जतन केला जातो. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एका पोलिस अधिकाऱ्याने असे म्हटले आहे की, दोन्ही तपास पूर्ण झाल्यानंतर आणि एफएसएलने अहवाल सादर केल्यानंतर, मृत्यूचे खरे कारण उघड होईल.

हेही वाचा - SHEFALI JARIWALA DEATH CASE: शेफाली जरीवाला मृत्यूप्रकरणी पती परागची चौकशी

हिस्टोपॅथॉलॉजी म्हणजे काय?

शवविच्छेदन दरम्यान मॅक्रोस्कोपिक तपासणीत मृत्यूचे कारण उघड होत नसल्यास हिस्टोपॅथॉलॉजीचा अवलंब केला जातो. हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये सूक्ष्मदर्शकाखाली ऊतींचे नमुने तपासले जातात. जेणेकरून मृत्यूला कारणीभूत ठरणारे किंवा त्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे सूक्ष्म बदल किंवा विशिष्ट रोग ओळखता येतील.

हेही वाचा - शेफाली जरीवालाच्या मृत्यूच्या मीडिया कव्हरेजवर वरुण धवन भडकला

शेफाली जरीवाला मृत्यू  - 

'काटा लगा गर्ल' शेफाली जरीवालाचा मृत्यू 27 जून रोजी झाला. असे म्हटले जाते की त्या दिवशी तिच्या घरात सत्यनारायण कथा होती, ज्यासाठी तिने उपवास केला होता. शेफालीने दुपारी 3 वाजेपर्यंत काहीही खाल्ले नाही आणि त्यानंतर तिने फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न खाल्ले, जे एक दिवस आधी शिजवले होते. वृत्तांनुसार, काही तासांनंतर, तिची प्रकृती बिघडली आणि रात्री 10:30 च्या सुमारास ती बेशुद्ध पडली. तिचा पती पराग त्यागी तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेला. पण तिथे पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
 


सम्बन्धित सामग्री