Sunday, March 08, 2026 01:12:12 PM

T20 World Cup 2026 Prize Money: टी-20 विश्वचषक 2026 विश्वविजेत्यावर पडणार पैशांचा पाऊस; विजेत्या संघाला मिळणार 'इतके' कोटी

दोन उपांत्य (Semi-finals) आणि एक अंतिम फेरीनंतर जगाला नवीन टी-20 विश्वविजेता मिळेल. टीम इंडिया पुन्हा एकदा जेतेपद राखणार की नवा संघ इतिहास घडवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

t20 world cup 2026 prize money टी-20 विश्वचषक 2026 विश्वविजेत्यावर पडणार पैशांचा पाऊस विजेत्या संघाला मिळणार इतके कोटी

T20 World Cup 2026 Prize Money: यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून केवळ 3 सामने शिल्लक आहेत. दोन उपांत्य (Semi-finals) आणि एक अंतिम फेरीनंतर जगाला नवीन टी-20 विश्वविजेता मिळेल. टीम इंडिया पुन्हा एकदा जेतेपद राखणार की नवा संघ इतिहास घडवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आयसीसीने (ICC) बक्षीस रकमेत मोठी वाढ केली असून, यंदाचा विजेता संघ मालामाल होणार आहे. आयसीसीने या वर्षासाठी एकूण 120.37 कोटी रुपयांचे भव्य बजेट निश्चित केले आहे.

20 संघांचा सहभाग आणि उपांत्य फेरीचे समीकरण
यंदाच्या विश्वचषकात एकूण 20 संघांनी सहभाग नोंदवला होता. पहिल्या फेरीनंतर केवळ 8 संघ सुपर-8 मध्ये पोहोचले आणि आता जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेले केवळ 4 संघ शिल्लक राहिले आहेत. पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड आमनेसामने येतील, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताची लढत इंग्लंडशी होणार आहे. या सामन्यांतील विजेते संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करतील, तर पराभूत संघांचा प्रवास तिथेच थांबेल.

विजेत्या संघाला मिळणार 27 कोटी; गेल्यावेळपेक्षा मोठी वाढ
2024 मध्ये जेव्हा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषक जिंकला होता, तेव्हा भारतीय संघाला 20.4 कोटी रुपये मिळाले होते. मात्र, 2026 मध्ये ही रक्कम लक्षणीयरीत्या वाढवण्यात आली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, यावेळच्या विजेत्या संघाला 27 कोटी रुपयांहून अधिक बक्षीस रक्कम मिळण्याची शक्यता आहे. आयसीसीने जागतिक स्तरावर क्रिकेटचा विस्तार करण्यासाठी आणि संघांना प्रोत्साहित करण्यासाठी या निधीत भरघोस वाढ केली आहे.

हेही वाचा - Sanju Samson Post: 'हे सर्व कष्टाचं...'; संजू सॅमसनने फक्त 5 शब्दांत व्यक्त केल्या भावना; असं काय लिहिलं की, 10 तासांत मिळाल्या लाखो लाईक्स

उपविजेते आणि उपांत्य फेरीतील संघांसाठीही कोट्यवधींची तरतूद
केवळ विजेत्यालाच नव्हे, तर अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या उपविजेत्या संघालाही अंदाजे 14.65 कोटी रुपये दिले जाणार आहेत. उपांत्य फेरीत पोहोचून बाहेर पडणाऱ्या संघांना प्रत्येकी 7.24 कोटी रुपये मिळतील. याशिवाय, स्पर्धेत 5 व्या ते 12 व्या क्रमांकावर राहिलेल्या संघांसाठी प्रत्येकी 3.48 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. चलनाचे मूल्य दररोज बदलत असल्याने अंतिम रकमेत किंचित बदल होऊ शकतो, तरीही ही आतापर्यंतची सर्वात मोठी बक्षीस रक्कम ठरणार आहे.


सम्बन्धित सामग्री