Tuesday, November 11, 2025 10:17:14 PM

Taliban Press Conference : तालिबानी परराष्ट्रमंत्र्यांच्या भारत दौऱ्यातील पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारला; प्रियांका गांधींनी नोंदवला आक्षेप

नवी दिल्लीतील अफगाण दूतावासात मुत्ताकी यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.

taliban press conference  तालिबानी परराष्ट्रमंत्र्यांच्या भारत दौऱ्यातील पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारला प्रियांका गांधींनी नोंदवला आक्षेप

Afghan FAM Amir Khan Muttaqi : तालिबानचे नेते आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांचा सध्याचा भारत दौरा एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काल (शुक्रवारी) नवी दिल्लीतील अफगाण दूतावासात मुत्ताकी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांसारख्या अनेक नेत्यांनी या घटनेवर जोरदार टीका केली आहे.

प्रियांका गांधींचा पंतप्रधान मोदींना थेट सवाल
केरळमधील वायनाडमधून खासदार असलेल्या प्रियांका गांधी यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या घटनेबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. प्रियांका गांधी यांनी प्रश्न केला आहे, "पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, कृपया तालिबानच्या प्रतिनिधीच्या भारत भेटीदरम्यानच्या पत्रकार परिषदेतून महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्याच्या घटनेबाबत तुमची भूमिका स्पष्ट करा."
"जर महिलांच्या हक्कांबाबतची तुमची भूमिका केवळ निवडणूक जिंकण्यासाठीचा देखावा नसेल, तर मग भारतातील सर्वांत सक्षम महिलांपैकी असलेल्या महिला पत्रकारांचा अपमान कसा काय होऊ दिला?" असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - India to Open Embassy in Kabul : तालिबानबाबत नवी दिल्लीचा मोठा निर्णय! भारत काबूलमध्ये उघडणार दूतावास केंद्र

पत्रकार परिषदेतील वस्तुस्थिती
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी बैठक झाल्यानंतर काही तासांतच अमीर खान मुत्ताकी यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेत एकूण 20 पत्रकार उपस्थित होते. परंतु, त्यामध्ये एकाही महिला पत्रकाराचा समावेश नव्हता. विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, महिला पत्रकारांना पत्रकार परिषदेत सहभागी न करण्याचा निर्णय मुत्ताकी आणि अफगाण दूतावासाच्या अधिकाऱ्यांनीच घेतला होता.

इतर नेत्यांकडूनही संताप व्यक्त
महुआ मोइत्रा: तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी व्हिडिओ प्रसिद्ध करत म्हटले की, "सरकारने महिला पत्रकारांना वगळून तालिबानच्या परराष्ट्रमंत्र्यांना भारतात पत्रकार परिषद घेण्याची परवानगी कशी दिली? एस. जयशंकर यांच्यासारख्या परराष्ट्रमंत्र्यांनी हे मान्य केले, हे कसे शक्य आहे? त्यांनी अशा अटी स्वीकारण्याची हिंमत कशी केली?" तसेच त्यांनी पुरुष पत्रकारांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला.

पी. चिदंबरम: माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीही 'X' वर संताप व्यक्त करत लिहिले की, "तालिबानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्या पत्रकार परिषदेतून महिला पत्रकारांना वगळण्यात आल्याचे ऐकून मला धक्का बसला. जेव्हा पुरुष पत्रकारांना महिला पत्रकारांचा समावेश नसल्याचे कळले, तेव्हा त्यांनी पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकायला हवा होता, असे माझे वैयक्तिक मत आहे."

हेही वाचा - Bagram Base: अफगाणिस्तान बग्राम तळावर कोणत्याही परदेशी सैन्याला परवानगी देणार नाही; परराष्ट्रमंत्री मवलावी अमीर खान मुत्ताकी यांची माहिती


सम्बन्धित सामग्री