चेन्नई : तामिळनाडूत सत्ता बदल झाले असून रविवारी जोसेफ विजय यांच्या पक्षातील आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात अवघ्या 29 वर्षांच्या एस. कीर्तना या विजय यांच्या नेतृत्वाखालील तामिळनाडू वेट्री कळघम (टीव्हीके) पक्षाच्या सर्वात तरुण आमदार बनल्या आहेत. त्यांनी 'विजय' सरकारच्या मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री बनण्याचा मान मिळवला. मात्र आज, सोमवारी विधानसभेत शपथ देण्यासाठी अनिवार्य असलेले निवडणूक प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे तामिळनाडूच्या मंत्री एस. कीर्तना यांना आमदार म्हणून शपथ घेता आली नाही. विधानसभेचे प्रधान सचिव के. श्रीनिवासन यांनी कीर्तना यांचे नाव पुकारले आणि त्यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित केले. त्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसमोर ठेवलेल्या व्यासपीठाकडे चालत गेल्या. थेट प्रक्षेपणात श्रीनिवासन हात उंचावून त्यांच्याकडे प्रमाणपत्र मागताना दिसले. मात्र, त्या कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत. त्या दोघांमधील संवाद ऐकू आला नाही, मात्र व्हिडीओमधून त्या शपथ न घेताच परत फिरल्याचे पाहायला मिळाले.
या घटनेबद्दल विचारले असता, एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले, "असे दिसते की, त्यांच्याकडे त्यांचे निवडणूक प्रमाणपत्र उपलब्ध नव्हते. त्या प्रमाणपत्र सादर करू न शकल्याने, वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना शपथ घेण्यास नम्रपणे नकार दिला. जेव्हा त्या त्यांचे निवडणूक प्रमाणपत्र सादर करतील, तेव्हा त्या शपथ घेऊ शकतील." अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, सर्व आमदारांना त्यांची प्रमाणपत्रे न चुकता आणण्याचे निर्देश देण्यात आले होते. ही आवश्यकता सरकारी प्रसिद्धीपत्रकातही नमूद करण्यात आली होती.
हेही वाचा : Thalapathy Vijay Women Cabinet Minister: 'विजय' मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री; जाणून घ्या कोण आहेत 29 वर्षीय एस. किर्तना?
मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि इतर आमदारांनी घटनात्मक प्रक्रियेनुसार शपथ घेण्यापूर्वी आपली प्रमाणपत्रे सादर केली. शिवकाशी मतदारसंघातून निवडून आलेल्या कीर्तना यांना मंत्रिमंडळातील नवव्या क्रमांकाच्या मंत्री म्हणून शपथविधीसाठी आमंत्रित करण्यात आल्या होत्या. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अशोकन जी. यांचा 11,670 मतांनी पराभव केला. तर माजी मंत्री आणि एआयएडीएमके नेते के. टी. राजेंद्रभलाजी तिसऱ्या क्रमांकावर राहिले. पेरंबूर आणि तिरुची पूर्व या दोन्ही मतदारसंघांतून विजयी झालेल्या विजय यांनी तिरुची पूर्व मतदारसंघाचा राजीनामा दिल्यानंतर तामिळनाडू विधानसभेची प्रभावी सदस्यसंख्या सध्या 233 झाली आहे.