BWF World Junior Championships: अवघ्या 16 वर्षांच्या तन्वी शर्माने जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत अप्रतिम प्रदर्शन करत 17 वर्षांनंतर भारतासाठी पदक जिंकले आहे. परंतु, ती अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकण्यात अपयशी ठरली. तरीही तिने इतिहास रचत देशाचे नाव उज्ज्वल केले. बँकॉक येथे झालेल्या या स्पर्धेत तन्वी शर्माने रौप्य पदक पटकावले. अंतिम फेरीत थायलंडच्या दुसऱ्या मानांकित अन्यपत फिचितप्रिचासककडून तन्वीला 15-7, 15-12 असा पराभव स्वीकारावा लागला. तन्वीच्या या पराक्रमाने भारताचा 17 वर्षांनंतर जागतिक ज्युनियर स्पर्धेतील दुष्काळ संपला आहे.
हेही वाचा - IND vs AUS: पराभवानंतरही कॅप्टन गिल खुश? सामन्याबद्दल केले धक्कादायक खुलासे; म्हणाला 'मैदानावर केलेली मेहनत...
यापूर्वी 2008 मध्ये सायना नेहवालने सुवर्ण आणि 2006 मध्ये रौप्य पदक, तर 1996 मध्ये अपर्णा पोपटने रौप्य पदक जिंकले होते. तन्वी ही जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी तिसरी भारतीय खेळाडू ठरली आहे.
हेही वाचा - Australia vs India 1st ODI: भारताच्या हाती निराशा! पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा दारुण पराभव
अंतिम सामन्यात तन्वीने जोरदार सुरुवात केली होती. पहिल्या गेममध्ये तिने 4-4 अशी बरोबरी साधली, मात्र नंतर थाई प्रतिस्पर्धीने अचूक स्मॅशेस आणि जबरदस्त कोर्ट कव्हरिंगसह आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये तन्वीने 6-1 अशी आघाडी घेतली होती, पण चुका वाढल्याने सामना तिच्या हातातून निसटला. तरीसुद्धा, तन्वी शर्माचे हे यश भारतीय बॅडमिंटनसाठी प्रेरणादायी ठरले आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल क्रीडा क्षेत्रातून आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.