Tejas Mk-1A: भारताच्या संरक्षण इतिहासातील आणखी एक अभिमानास्पद क्षण आज नाशिकमध्ये घडला. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या नव्या उत्पादन केंद्रातून तेजस एमके-1ए लढाऊ विमानाने पहिल्यांदाच यशस्वी उड्डाण केले. या वेळी राजनाथ सिंह यांनी सांगितले की, 'आज माझी छाती अभिमानाने फुलून आली आहे. हे भारताच्या स्वावलंबनाचे प्रतीक आहे.'
दरवर्षी 8 नवीन तेजस विमानांची निर्मिती
नाशिकमधील नवीन उत्पादन लाइन हे तेजस एलसीए एमके-1ए साठी तिसरे उत्पादन केंद्र आहे. बेंगळुरूतील दोन विद्यमान कारखान्यांमध्ये दरवर्षी 16 विमाने तयार होतात. नाशिक येथील या नव्या सुविधेमुळे दरवर्षी आणखी 8 विमाने भारतीय हवाई दलात सामील होतील. या प्रकल्पात 150 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून, HAL ची एकूण उत्पादन क्षमता 24 विमाने प्रतिवर्ष इतकी वाढणार आहे.
हेही वाचा - Diwali 2025: सावधान! मिठाईत होतेय भेसळ, दोन महिन्यात सुमारे दोन कोटी रुपयांचे भेसळयुक्त पदार्थ जप्त
नाशिकची भूमी श्रद्धा आणि स्वावलंबनाचे प्रतीक - राजनाथ सिंह
राजनाथ सिंह म्हणाले, टनाशिक ही केवळ श्रद्धेची भूमी नाही, तर ती स्वावलंबी भारताच्या क्षमतेचे प्रतीक आहे. येथे उभारलेले HAL चे उत्पादन केंद्र देशाच्या संरक्षण सामर्थ्याचे दर्शन घडवते. आज सुखोई-30, एलसीए आणि एचटीटी-40 या सर्व विमानांचे उड्डाण पाहून माझी छाती अभिमानाने फुलली.'
‘मेक इन इंडिया’ची ताकद
संरक्षणमंत्र्यांनी नमूद केले की, जे उपकरणे आपण पूर्वी परदेशातून विकत घेत होतो, ती आता आपण भारतामध्येच तयार करत आहोत. लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, इंजिन्स आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स या सर्व क्षेत्रांत आपण आत्मनिर्भर झालो आहोत.' त्यांनी पुढे सांगितले की, आज भारत अवकाश क्षेत्रातही मजबूत स्थितीत आहे. एरोस्पेस उद्योग जलदगतीने वाढत आहे आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमामुळे स्थानिक उत्पादनाला मोठे बळ मिळाले आहे.
हेही वाचा - Gujarat Cabinet Reshuffle: गुजरातमध्ये मंत्रिमंडळ विस्तार! हर्ष संघवी यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
दरम्यान, तेजस एमके-1ए हे भारतीय हवाई दलाच्या मिग-21 विमानांच्या जागी आणले जाणारे अत्याधुनिक विमान आहे. हे 4.5 पिढीतील बहुउद्देशीय लढाऊ विमान असून, हवाई संरक्षण, जमिनीवरील हल्ला आणि सागरी मोहिमा पार पाडण्यास सक्षम आहे. या विमानात 64 टक्के स्वदेशी घटकांचा वापर करण्यात आला आहे. सुधारित एव्हिऑनिक्स, आधुनिक शस्त्र प्रणाली, आणि हवेतून हवेत इंधन भरण्याची क्षमता यामुळे हे विमान भारतीय संरक्षण तंत्रज्ञानाचे नवे प्रतिक बनले आहे.