Abdul Rahman killed : अयोध्या येथील भव्य राम मंदिर स्फोटाने उडवून देण्याचा कट रचणाऱ्या 20 वर्षीय दहशतवादी अब्दुल रहमान याची फरीदाबाद येथील जिल्हा कारागृहात निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सोमवारी (9 फेब्रुवारी 2026) सकाळी तुरुंग प्रशासनाने या घटनेची माहिती दिली. फरीदाबादच्या नीमका जेलमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून, एका दहशतवाद्याचा अशा प्रकारे अंत झाल्याने तुरुंगाच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कैद्यांमधील झटापटीत धारदार शस्त्राने हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (8 फेब्रुवारी) रात्री उशिरा तुरुंगात दोन कैद्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. नुकतेच जम्मू-काश्मीरमधून या तुरुंगात हलवण्यात आलेल्या अरुण चौधरी नावाच्या कैद्याने अब्दुल रहमानवर एका धारदार वस्तूने वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, रहमानचा जागीच मृत्यू झाला. तुरुंग अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती सोमवारी सकाळी मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.
हेही वाचा - Crime News: लॉ कॉलेजमध्ये गोळीबाराचा थरार! वर्गातच विद्यार्थिनीची हत्या; आरोपी विद्यार्थ्याने स्वतःवरही गोळी झाडली
राम मंदिर उडवण्याचा होता कट
अब्दुल रहमानला मार्च 2025 मध्ये गुजरात एटीएस (ATS) आणि हरियाणा एसटीएफ (STF) च्या संयुक्त मोहिमेत फरीदाबादजवळील पाली गावातून अटक करण्यात आली होती. तो 'अलकायदा इन इंडियन सब-काँटिनेंट' (AQIS) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू सुफियान याच्या थेट संपर्कात होता. अयोध्येतील राम मंदिरावर ग्रेनेड हल्ला करण्याचा आणि मंदिर स्फोटाने उडवून देण्याचा त्याचा मोठा कट होता. त्याच्या अटकेनंतर त्याचे संबंध पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI शी असल्याचेही तपासात समोर आले होते.
तपासाचे चक्र वेगाने फिरले
अब्दुल रहमान हा मूळचा अयोध्येतील मिल्कीपूरचा राहणारा होता. त्याच्या अटकेच्या वेळी त्याच्याकडून स्लीपर सेलशी संबंधित माहिती आणि ग्रेनेड पुरवठ्याबाबतचे पुरावे पोलिसांना मिळाले होते. एका कट्टरवादी विचारांच्या दहशतवाद्याची तुरुंगातच हत्या झाल्याने आता हरियाणा पोलीस आणि तुरुंग प्रशासन या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. हल्लेखोर अरुण चौधरी आणि रहमान यांच्यात वादाचे नेमके कारण काय होते आणि तुरुंगात धारदार वस्तू आली कुठून, याचा शोध पोलीस घेत आहेत.
हेही वाचा - Accident News: श्रीमंतीचा उन्माद! प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या लेकाचा रस्त्यावर कहर; भरधाव लॅम्बोर्गिनीने 6 जणांना चिरडलं