Tuesday, November 18, 2025 03:47:27 AM

Reverse Mortgage : घर विकण्याचे अन् भाडेकरूंचे संकट दूर; सरकारची 'ही' योजना घरावर देईल पगारासारखे मासिक उत्पन्न

ही योजना 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी खास तयार करण्यात आली आहे. सामान्य कर्जात आपण बँकेला पैसे देतो, पण रिव्हर्स मॉर्टगेजमध्ये बँक तुम्हाला पैसे देते.

reverse mortgage  घर विकण्याचे अन् भाडेकरूंचे संकट दूर सरकारची ही योजना घरावर देईल पगारासारखे मासिक उत्पन्न

Reverse Mortgage: निवृत्तीनंतर उत्पन्न थांबते, पण खर्च मात्र तसाच राहतो. ही लाखो ज्येष्ठ नागरिकांची सर्वसामान्य अडचण आहे. पण जर तुमचे घरच तुमच्या “पगाराचे साधन” बनले, तर?  होय, केंद्र सरकारची ‘रिव्हर्स मॉर्टगेज योजना’ (Reverse Mortgage Scheme) ज्येष्ठांना घर विकल्याशिवाय मासिक उत्पन्न मिळवून देते. म्हणजेच, भाडेकरू नाही, घर विक्री नाही तरीही तुमच्या खात्यात दरमहा ठराविक रक्कम जमा केली जाते. 

रिव्हर्स मॉर्टगेज म्हणजे काय?

ही योजना 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी खास तयार करण्यात आली आहे. सामान्य कर्जात आपण बँकेला पैसे देतो, पण रिव्हर्स मॉर्टगेजमध्ये बँक तुम्हाला पैसे देते. तुम्ही तुमचे घर बँकेकडे गहाण ठेवता, पण त्यावर तुमचे राहण्याचे हक्क कायम राहतात. त्याबदल्यात तुम्हाला दरमहा पेन्शनसारखे निश्चित उत्पन्न मिळते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यासाठी तुम्हाला कोणतेही हप्ते किंवा व्याज भरावे लागत नाही.

हेही वाचा - Gold Price Today: आज पुन्हा सोन्याच्या भावात घसरण, पण चांदी झाली महाग; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

किती रक्कम मिळू शकते?

बँक तुमच्या घराचे बाजार मूल्य, वय आणि ठिकाणानुसार रक्कम निश्चित करते. उदाहरणार्थ, जर घराची किंमत 50 लाख असेल, तर तुम्हाला दरमहा अंदाजे 20 ते 30 हजार रुपये  मिळू शकतात. म्हणजेच, घर तेच राहते. पण आता ते तुमच्यासाठी “पगार कमावणारे मालमत्ता” बनते.

हेही वाचा - Gold Price Prediction: लग्नसराईपूर्वी सोन्याच्या भावात मोठी घट; पण खरेदीसाठी योग्य वेळ कोणती? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या

मृत्यूनंतर काय होते?

घरमालक जिवंत असताना बँक दरमहा पैसे देते. मालकाच्या मृत्यूनंतर बँक घर विकून आपली रक्कम वसूल करते. जर वारसांना घर ठेवायचे असेल, तर ते बँकेची रक्कम परतफेड करून घर परत घेऊ शकतात. जर घराची किंमत कर्जापेक्षा जास्त असेल, तर उर्वरित रक्कम वारसांना परत दिली जाते.

कोण घेऊ शकतो या योजनेचा लाभ?

अर्जदाराचे वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. 
घर स्वतःच्या नावावर आणि कर्जमुक्त असावे.
मालमत्ता भारतामध्ये असणे आवश्यक
पती-पत्नी दोघे मालक असतील, तर दोघांचाही करारात समावेश केला जातो. 

ही योजना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मंजूर केली असून एसबीआय, पीएनबी आणि काही खाजगी बँका यासारख्या अनेक बँका ही सुविधा देतात. पेन्शन नसलेल्या पण घर असलेल्या वृद्धांसाठी ही योजना आर्थिक आधाराचा नवा मार्ग ठरू शकते. घर आता फक्त छप्पर नसून सन्मानाने जगण्यासाठी उत्पन्नाचे साधन बनू शकते.
 


सम्बन्धित सामग्री