मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पराभूत झालेल्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी ईव्हीएमवर खापर फोडायला सुरुवात केली आहे. आष्टी आणि उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील मतांमध्ये तफावत आहे असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रक काढले आहे. इंग्रजी वृत्तपत्राने दिशाभूल करणारे वृत्त प्रसिद्ध केले आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले. आयोगाने मतांच्या तफावतीच्या मुद्यावर आकडेवारी सादर केली आहे. मतांमध्ये तफावत असल्याचा दावा खोटा असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने तो फेटाळला आहे.
आष्टी विधानसभा मतदारसंघात ईव्हीएमद्वारे एकूण मते पडली दोन लाख 82 हजार 246. टपाली पद्धतीने आलेली एकूण मते 5013. यातील टपालाने आलेल्या मतांपैकी 475 मते बाद ठरवण्यात आली. नियमांच्याआधारे निवडणूक अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. यामुळे टपालाने आलेली आणि मोजणीसाठी वैध ठरलेली मते उरली 4538. विशेष म्हणजे तक्रार करणाऱ्यांनी आष्टीत टपाली मते, ईव्हीएमद्वारे आलेली मते, बाद ठरलेली मते अशी सविस्तर आकडेवारी सप्रमाण जाहीर केलेली नाही. फक्त आष्टीत मतांची तफावत आहे, असा आरोप केला आहे. हा आरोप निवडणूक आयोगाने आकडेवारी सादर करत फेटाळला आहे.
याच पद्धतीने उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात ईव्हीएमद्वारे एकूण मते पडली दोन लाख 38 हजार 840. टपाली पद्धतीने आलेली एकूण मते 4330. यातील टपालाने आलेल्या मतांपैकी 175 मते बाद ठरवण्यात आली. नियमांच्याआधारे निवडणूक अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. यामुळे टपालाने आलेली आणि मोजणीसाठी वैध ठरलेली मते उरली 4155. विशेष म्हणजे तक्रार करणाऱ्यांनी उस्मानाबादमध्ये टपाली मते, ईव्हीएमद्वारे आलेली मते, बाद ठरलेली मते अशी सविस्तर आकडेवारी सप्रमाण जाहीर केलेली नाही. फक्त उस्मानाबादमध्ये मतांची तफावत आहे, असा आरोप केला आहे. हा आरोप निवडणूक आयोगाने आकडेवारी सादर करत फेटाळला आहे.
निवडणूक आयोगाची भूमिका
मतांच्या तफावतीबाबत आरोप करणारे काही वेळा एकूण मते सांगतात. नंतर ईव्हीएममध्ये पडलेल्या मतांचा आकडा जाहीर करुन मतांमध्ये तफावत असल्याचा आरोप केला. तसेच काही वेळा टपालातून आलेल्या मतांपैकी बाद मतांविषयी बोलणे टाळतात पण मतांमध्ये तफावत असल्याचा आरोप केला. हा दिशाभूल करणारा प्रकार आहे. भारतीय ईव्हीएम इंटरनेटशी जोडलेले नाही आणि ते हॅक होऊ शकत नाही. आव्हान देऊनही भारतातल्या एकाही राजकीय पक्षाने अथवा तज्ज्ञाने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भारतीय ईव्हीएम हॅक करुन दाखवलेले नाही. आयोगाच्या नियमानुसार मतदानाच्या दिवशी तसेच मतमोजणीच्या दिवशी उमेदवारांचे प्रतिनिधी मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्र येथे उपस्थित असतात. उमेदवारांच्या प्रतिनिधीने आक्षेप घेतले तर मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया स्थगित करुन तसेच मतमोजणीवेळी ती प्रक्रिया स्थगित करुन आधी आक्षेप दूर केले जातात. यानंतर प्रक्रिया पुढे सुरू होते. यामुळे मतांमध्ये तफावत असल्याचे इंग्रजी वृत्तपत्राचे वृत्त दिशाभूल करणारे आहे; असे निवडणूक आयोगाने सांगितले.