Harshwardhan Sapkal : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या संदर्भात केलेल्या एका वक्तव्यावरून राज्यभरात वादंग निर्माण झाला होता. या वादावर आता सपकाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी 'मनःपूर्वक क्षमा मागतो' असे म्हणत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
काय आहे नेमका प्रकार?
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करताना टिपू सुलतानचा उल्लेख केला होता. मात्र, भाजपने या वक्तव्याचा विपर्यास करून चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध केल्याचा आरोप सपकाळ यांनी केला आहे. 'विशिष्ट व्होट बँकेसाठी काँग्रेसचा हा खरा चेहरा आहे,' अशी टीका सत्ताधारी भाजप नेत्यांनी केली होती.
फेसबुक पोस्टद्वारे भाजपवर निशाणा
वाढता वाद आणि शिवप्रेमींचा रोष पाहता सपकाळ यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, 'भाजपने अत्यंत गलिच्छ आणि खोडसाळपणे माझ्या शब्दांचा गैरवापर केला. राजकीय फायद्यासाठी माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. कोणाच्याही भावना दुखावणं हा माझा हेतू नव्हता. तरीही माझ्या शब्दांमुळे शिवभक्तांना त्रास झाला असेल, तर मी खेद व्यक्त करतो.'
हेही वाचा - Kunal Kamra Case Update : एकनाथ शिंदेंवरील विडंबनात्मक प्रकरण; वर्षभरानंतर कुणाल कामरा हक्कभंग समिती समोर हजर, मात्र सुनावणी पुढे ढकलली, कारण समोर
अभंगातून उत्तर
आपल्या भूमिकेचे समर्थन करताना त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या 'भले तरि देऊं कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी' या ओळींचा वापर करत विरोधकांना सुनावले आहे. दरम्यान, शिवरायांची तुलना टिपू सुलतानशी केल्यानंतर सपकाळ यांना सोशल मीडियावर धमक्या आल्या होत्या, तर काही शिवप्रेमींनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर जाऊन निषेधही नोंदवला होता. या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी शिवप्रेमींची माफी मागितली आहे. यानंतर आता या संपूर्ण वादावर पडदा पडणार की, राजकारण अधिक तापणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.