Bihar Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठा उलटफेर घडवला आहे. एनडीएने मिळवलेल्या प्रचंड बहुमतामुळे नितीश कुमार पुन्हा सत्तेच्या गादीवर बसणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. यानुसार, नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या दिशेने वाटचाल करत असून, राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे.
महिला मतदारांचा कौल ठरला निर्णायक
एनडीएचा हा भक्कम विजय साधण्यात सर्वाधिक प्रभाव पडला तो म्हणजे महिलांसाठी राबवलेल्या योजनांचा. विशेषतः ‘मुख्यमंत्री महिला उद्योजिका योजना’, ज्यांतर्गत तब्बल 1.5 कोटी महिलांच्या खात्यात थेट 10,000 रुपये जमा करण्यात आले, या योजनेने निकालावर मोठा परिणाम घडवला. 29 ऑगस्ट 2025 रोजी मंत्रिमंडळाने या योजनेला हिरवा कंदील दाखवताच विरोधकांनी याला “मतांची खरेदी” अशी टीका केली होती. मात्र, निकालाने महिलांचा विश्वास नितीशकुमारांच्या बाजूने ठामपणे उभा आहे, हे स्पष्ट केले. बिहारमधील 3.6 कोटी महिला मतदारांपैकी 1.5 कोटींना थेट लाभ मिळाल्यामुळे महिला मतदानात तब्बल 71 टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद झाली आहे. ही योजना कर्ज नसून थेट मदत असल्याने महिलांमध्ये तिचा मोठा परिणाम दिसून आला. या पैशातून लघुउद्योग सुरू करणाऱ्या महिलांना पुढे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार असल्याची घोषणाही प्रभावी ठरली.
हेही वाचा - Bihar Election Result 2025: बिहार निवडणुकीत NDA चा ऐतिहासिक विजय! अमित शाह यांनी दिली पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, 26 ऑक्टोबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचे व्हर्च्युअल उद्घाटन केले होते. पहिल्या टप्प्यात 75 लाख महिलांना मदत पोहोचवण्यात आली आणि पुढे ती संख्या दुपटीपेक्षा जास्त होऊन 1.5 कोटींवर गेली. तथापी, नितीश कुमार यांनी गेल्या 20 वर्षांत महिलांसाठी अनेक उपक्रम चालवले. यात मुलींसाठी मोफत सायकल योजना, पंचायतीत महिलांना 50 टक्के आरक्षण, सरकारी नोकऱ्यांमध्ये 35 टक्के आरक्षण आणि आता 10,000 रुपयांची थेट आर्थिक मदत. या धोरणांमुळे महिला मतदारांचा विश्वास पुन्हा एकदा त्यांच्या बाजूने झुकला.
हेही वाचा - 'राहुल गांधी.. 95!' बिहारमधील यशानंतर भाजपने उडवली जोरदार खिल्ली 'असा पराभवांचा विक्रम.. आकडा वाढतच आहे!'
नितीश कुमार दहाव्यांदा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ?
नितीश कुमार हे भारतातील सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांनी पहिल्यांदा 3 मार्च 2000 रोजी मुख्यमंत्रीपद स्वीकारले होते. परंतु, तेव्हा त्यांचा पहिला कार्यकाळ फक्त सात दिवसांचा ठरला. त्यानंतर त्यांनी 2005, 2010, 2015, 2017, 2020, 2022, 2024 अशी अनेक वेळा सत्ता हस्तगत केली आहे. आता निकालानुसार, ते दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता अत्यंत प्रबळ आहे.