अमरावती : माजी खासदार आणि भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांना धमकीचे पत्र आले आहे. सामूहिक अत्याचार करू आणि घरासमोर गाय कापू अशी धमकी पत्राद्वारे नवनीत राणांना देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याने पत्रातून स्वतःची ओळख आमिर अशी दिली आहे. हैदराबादमध्ये वास्तव्यास आहे, असेही त्याने स्वतःविषयी पत्रात नमूद केले आहे. आमिरने पत्र पत्नीकडून लिहून घेत असल्याचे नमूद केले आहे.
सुरक्षिततेची हमी म्हणून धमकी देणाऱ्याने नवनीत राणांकडे दहा कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. खंडणी दिली तर काही करणार नाही अशी ग्वाही पत्रातून देण्यात आली आहे.
भावाने, वसीमने दुबईतून केलेल्या फोनला प्रतिसाद दिला नाही म्हणून पत्र पाठवत असल्याचे आमिरने लिहिले आहे. त्याने पत्रात वसीमचा दुबईचा नंबर पण दिला आहे. पत्रामध्ये 'पाकिस्तान झिंदाबाद' असेही लिहिले आहे. या प्रकरणी नवनीत राणांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.