Monday, May 11, 2026 10:52:49 AM

Crime News : 'भारतातून निघा', भारतीय व्हिसा नियम मोडणाऱ्या अमेरिकन नागरिकांना पोलिसांचा दणका; टुरिस्ट व्हिसावर येऊन करत होते धर्मप्रसार

भारतीय कायद्यानुसार पर्यटक व्हिसावर आलेल्या परदेशी नागरिकांना धार्मिक प्रचार किंवा शिकवणुकीचे काम करण्यास सक्त मनाई आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.

crime news  भारतातून निघा भारतीय व्हिसा नियम मोडणाऱ्या अमेरिकन नागरिकांना पोलिसांचा दणका टुरिस्ट व्हिसावर येऊन करत होते धर्मप्रसार

American Nationals Leave India Notice for Visa Rule Violation in Pune : पुण्याच्या सांस्कृतिक नगरीत टुरिस्ट व्हिसावर आलेल्या तीन परदेशी नागरिकांना बेकायदेशीररित्या धर्मप्रसार करणे महागात पडले आहे. पुण्याच्या शुक्रवार पेठ भागात ख्रिश्चन धर्माचा प्रचार करत असताना हे अमेरिकन नागरिक पोलिसांच्या जाळ्यात अडकले. भारतीय कायद्यानुसार पर्यटक व्हिसावर आलेल्या परदेशी नागरिकांना धार्मिक प्रचार किंवा शिकवणुकीचे काम करण्यास सक्त मनाई आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पुणे पोलिसांनी या तिघांनाही कठोर पाऊल उचलत 'लीव्ह इंडिया' (Leave India) नोटीस बजावली आहे.

शुक्रवार पेठेतील 'ती' घटना
मिळालेल्या माहितीनुसार, 53, 65 आणि 66 वर्षे वयांचे हे तीन नागरिक 19 ते 21 एप्रिल दरम्यान भारतात आले होते. 27 एप्रिल रोजी ते पुण्यातील शुक्रवार पेठ परिसरात फिरत असताना, त्यांनी एका कॅब ड्रायव्हरला थांबवून त्याच्याशी धार्मिक चर्चा सुरू केली. या तिघांनी त्या चालकाला इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत छापलेली धार्मिक पत्रके देऊन ख्रिश्चन धर्म इतर धर्मांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. सजग कॅब चालकाने तातडीने तिथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले.

तपास आणि पोलिसांची कारवाई
ताब्यात घेतल्यानंतर या नागरिकांची कसून चौकशी करण्यात आली. त्यांच्या बॅगांची झडती घेतली असता पोलिसांना मोठ्या प्रमाणावर बायबल आणि ख्रिश्चन धर्माशी संबंधित बहुभाषिक पत्रके सापडली. पोलिसांच्या विशेष शाखेने आणि परदेशी नोंदणी कार्यालयाने (FRO) केलेल्या तपासात हे स्पष्ट झाले की, हे नागरिक केवळ पर्यटनासाठी आले नसून त्यांचा मुख्य उद्देश धार्मिक प्रचार हाच होता. पासपोर्ट तपासला असता हे तिघेही यापूर्वी 2016 पासून कधी टुरिस्ट तर कधी बिझनेस व्हिसावर भारतात आल्याचे दिसून आले. मात्र, ते कोणत्याही अधिकृत व्यवसायात गुंतलेले आढळले नाहीत.

हेही वाचा - Raja Raghuvanshi Case : राजा रघुवंशी मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट; हनिमूनला गेल्यानंतर पतीचा गेम करणाऱ्या पत्नी सोनम रघुवंशीला जामीन मंजूर

10 मे पर्यंत देश सोडण्याचे आदेश
पुणे शहर पोलिसांच्या परदेशी नोंदणी कार्यालयाचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी या कारवाईची अधिकृत माहिती दिली. इमिग्रेशन आणि फॉरेनर्स ॲक्टमधील तरतुदींनुसार, व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल या तिघांनाही 10 मे 2026 पर्यंत किंवा त्यापूर्वी भारत सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विहित मुदतीत देश न सोडल्यास त्यांच्यावर अधिक कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

धर्मांतराच्या घटनांचे सत्र जोरात
विशेष म्हणजे, पुण्यात आणि आसपासच्या परिसरात अशा प्रकारच्या घटना वाढताना दिसत आहेत. यापूर्वी जुलै 2025 मध्येही पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एका 41 वर्षीय अमेरिकन नागरिकाला धर्मांतराच्या प्रयत्नावरून अटक केली होती. तो व्यक्ती आर्थिक मदतीचे आमिष दाखवून लोकांचे धर्मांतर करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. नाशिकमध्येही गेल्या काही दिवसांपासून धर्मांतर प्रकरणावरून मोठी चर्चा सुरू असतानाच पुण्यातील या घटनेने खळबळ उडवून दिली आहे. पर्यटन व्हिसाचा गैरवापर करून देशातील सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर पोलिसांची आता करडी नजर आहे.

हेही वाचा - SBI Bank Robbery: ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या शाखेत सशस्त्र दरोडा; 52 लाखांची रोकड लंपास, कर्मचाऱ्यांच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकी


सम्बन्धित सामग्री