Toll Tax Rules : दैनंदिन प्रवासात टोल प्लाझावरून जाताना खिशाला कात्री बसते. जर तुम्हाला कामानिमित्त रोज टोल नाक्यावरून जावे लागत असेल, तर महिन्याकाठी हजारो रुपये खर्च होतात. मात्र, केंद्र सरकारच्या नियमांनुसार, अवघ्या 340 रुपयांत तुम्ही महिनाभर अमर्यादित वेळा टोल प्लाझावरून प्रवास करू शकता. ही सवलत केवळ व्हीआयपी लोकांसाठी नसून सामान्य नागरिकांसाठी देखील उपलब्ध आहे.
काय आहे हा 340 रुपयांचा मासिक पास?
जर तुमचे निवासस्थान टोल प्लाझापासून 20 किलोमीटरच्या परिघामध्ये असेल, तर तुम्ही या विशेष मासिक पासचा लाभ घेऊ शकता. हा पास बनवल्यानंतर तुम्हाला प्रत्येक वेळी टोल भरण्याची गरज पडत नाही. केवळ 340 रुपये भरून तुम्ही एका महिन्यात कितीही वेळा तुमची गाडी टोल नाक्यावरून नेऊ शकता. हा नियम प्रामुख्याने स्थानिक रहिवाशांना आर्थिक दिलासा देण्यासाठी बनवण्यात आला आहे.
पास मिळवण्यासाठीचे नियम आणि अटी
1. स्थानिक रहिवासी: तुमचा पत्ता टोल प्लाझापासून 20 किलोमीटरच्या आत असणे अनिवार्य आहे.
2. खाजगी वाहने: ही सवलत केवळ वैयक्तिक वापराच्या (White Plate) खाजगी गाड्यांसाठी आहे. टॅक्सी किंवा व्यावसायिक (Commercial) वाहनांना हा पास मिळत नाही.
3. कागदपत्रे: अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, वीज बिल किंवा रेशन कार्ड यांपैकी एक रहिवासी पुरावा सादर करावा लागेल.
4. अर्ज प्रक्रिया: तुम्हाला संबंधित टोल प्लाझावर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करावी लागेल आणि 340 रुपये शुल्क जमा करावे लागेल. त्यानंतर तुमचा मासिक पास सक्रिय होईल.
हेही वाचा - Cashless Toll Plaza: टोल नाक्यांवर ''कॅश''ला कायमचा रामराम?; ''या'' तारखेपासून सुरू होतेय नवी डिजिटल क्रांती
टोल प्लाझावर मिळणाऱ्या मोफत सुविधा
टोल नाक्यावर फक्त करच वसूल केला जात नाही, तर प्रवाशांना अनेक सुविधा मोफत दिल्या जातात, ज्याची माहिती अनेकांना नसते:
पिण्याचे पाणी व शौचालय: टोल प्लाझावर स्वच्छ पिण्याचे पाणी आणि महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालयांची सोय मोफत असते.
रुग्णवाहिका व प्रथमोपचार: अपघाताच्या वेळी किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत टोल प्लाझाकडून मोफत रुग्णवाहिका सेवा आणि प्रथमोपचार उपलब्ध करून दिले जातात.
क्रेन सेवा: तुमची गाडी टोल परिसरात खराब झाली किंवा अपघात झाला, तर क्रेनची सुविधा मोफत मिळवण्याचा तुम्हाला अधिकार आहे.
मदत व सुरक्षा: प्रत्येक टोल नाक्यावर हेल्पलाइन नंबर दिलेला असतो, ज्यावर कॉल करून तुम्ही तातडीची मदत मागू शकता.
आर्थिक ओझं कसं कमी होईल?
समजा एका प्रवाशाला रोज टोलसाठी 60 ते 100 रुपये द्यावे लागत असतील, तर महिन्याचा खर्च 2000 ते 3000 रुपयांपर्यंत जातो. अशा स्थितीत केवळ 340 रुपयांचा पास स्थानिक लोकांसाठी अत्यंत स्वस्त आणि फायदेशीर ठरतो. जर तुमचे घर महामार्गाच्या किंवा टोल नाक्याच्या जवळ असेल, तर आजच या सुविधेचा लाभ घ्या जेणेकरून तुमचे कष्टाचे पैसे वाचू शकतील.
हेही वाचा - National Highway Toll Rules : अपूर्ण राष्ट्रीय द्रुतगती मार्गांवर आता ''हा'' टोल बंद; 15 फेब्रुवारीपासून नवे नियम लागू