मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना ५ ते १९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाची माहिती दिली. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर (टोल) माफीबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. मुंबई-बंगळुरू आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तसेच इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असेल.
टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव २०२४, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल.