छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमधील पळसखेडा येथे एकतर्फी प्रेमाच्या जाचाला कंटाळून एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या केली. अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम करून संबंध ठेवण्यासाठी वारंवार चिठ्ठी देऊन तरुण तिला भेटण्यासाठी आग्रह करत होता. अल्पवयीन मुलीच्या मनाविरूद्ध एकतर्फी प्रेमातून आग्रह करून त्रास देत असल्याने अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या मुलीच्या आत्महत्येनंतर तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरून त्रास देणाऱ्या मुलाविरोधात फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पळसखेडा येथील रहिवासी सुनील राजू सोनत त्याच्या घरासमोर राहत असलेल्या सोळा वर्षीय मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. त्यामुळे तो त्या मुलीला नेहमी त्रास देत होता. तिला भेटून माझ्याशी संबंध ठेव असे म्हणत वारंवार तिला चिठ्ठया देत होता. तिच्या मनाविरुद्ध हा सर्व प्रकार तो करत होता. अल्पवयीन मुलगी या त्रासाला कंटाळली होती. याबाबत तिने घरच्यांनाही सांगितले होते. घरच्या लोकांनी त्याला असे करू नकोस म्हणून समजावून सांगितले होते. तरीही तो त्रास देत होता. अखेर या अल्पवयीन मुलीने त्रासाला कंटाळून 27 नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतला.
एकतर्फी प्रेमाच्या जाचाला कंटाळून सोळा वर्षीय मुलीने आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. ये घटनेसाठी परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे. या घटनेतून पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेच्या मुद्दा ऐरणीवर आला आहे.