धाराशिव : तुळजाभवानी मंदिरात सोने आणि चांदीच्या अपहार प्रकरणी गुन्हेगारी अन्वेषण विभागचा (सीआयडी) अहवाल अखेर जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला आहे. त्यामुळे संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाने आदेश देऊनही गुन्हे दाखल न झाल्याने हिंदू जनजागृती समितीने न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस देऊन गुन्हे दाखल करण्याबाबत विचारणा केली होती.
गृह खात्याकडून तपासाचा अहवाल प्राप्त झाला नसल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. परंतु सीआयडीने केलेल्या चौकशीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपांवर गुन्हे दाखल करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासेंनी याप्रकरणी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेत आहोत असे सांगितले आहे.