पुणे : महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांच्या विनंतीला मान देत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी उपोषण सोडले.
ईव्हीएम संदर्भात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी काही आक्षेप घेतले आहेत. त्यांनी ईव्हीएमला विरोध करण्यासाठी उपोषण सुरू केले आहे. बाबा आढाव यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली. याप्रसंगी ईव्हीएमचे आंदोलन महाविकास आघाडी पुढे नेईल असे आश्वासन देत उद्धव ठाकरेंनी बाबा आढावांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. या विनंतीला मान देत बाबा आढाव यांनी उपोषण सोडले.
याआधी राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान झाले. ईव्हीएमद्वारे कोट्यवधी मते नोंदवली गेली. यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली. निकाल जाहीर झाला. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यानंतर महाविकास आघाडीने ईव्हीएमला विरोध सुरू केला. विशेष म्हणजे ईव्हीएमद्वारे मते मिळवून विजयी झालेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी स्वतःच्या निकालाविषयी शंका व्यक्त केली नाही. पण महाविकास आघाडीने त्यांच्या पराभूत झालेल्या उमेदवारांच्या मतदारसंघांमध्ये ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केल्या. यानंतर बाबा आढाव यांनी ईव्हीएम विरोधात उपोषण सुरू केले.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पैशांचा धुमाकूळ झाला. ईव्हीएमद्वारे मतदान घेण्यात आले, त्यात काहीतरी घोटाळा झाला, असे बाबा आढाव म्हणाले. मतदानात काहीतरी गडबड असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
कोण आहेत बाबा आढाव ?
बाबा आढाव हे 1970 मध्ये पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते. ते तत्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते. रिक्षा पंचायतीचे काम करत होते. त्यांनी 'एक गाव एक पाणवठा' ही योजना राबवली होती. ते 94 वर्षांचे आहेत.