Monday, November 17, 2025 07:19:32 AM

Helicopter Fish : उजनी धरणात 'हेलिकॉप्टर' माशांचा सुळसुळाट; शोभेचा मासा गोड्या पाण्यातील प्रजातींसाठी धोकादायक, मच्छीमार चिंतेत

जलाशयात 'हेलिकॉप्टर' माशांचा वेगाने वाढणारी संख्या मच्छीमारांसाठी मोठी समस्या बनली आहे. हा मासा गोड्या पाण्यात सहजपणे वाढतो आणि त्यांची संख्या खूप वेगाने वाढते.

helicopter fish  उजनी धरणात हेलिकॉप्टर माशांचा सुळसुळाट शोभेचा मासा गोड्या पाण्यातील प्रजातींसाठी धोकादायक मच्छीमार चिंतेत

इंदापूर : यंदा अतिवृष्टीमुळे उजनी धरण (Ujani Dam) लवकर भरले. परंतु, मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे मत्स्यबीज (Fish Seed) मोठ्या प्रमाणावर वाहून गेले. यामुळे जलाशयात गोड्या पाण्यातील पारंपरिक माशांचे प्रमाण सध्या खूपच कमी झाले आहे. अशातच, जलाशयात 'हेलिकॉप्टर' माशांचा वेगाने वाढणारी संख्या मच्छीमारांसाठी मोठी समस्या बनली आहे. शोभेचा मासा म्हणून घरगुती मत्स्यालयात (Aquarium) पाळला जाणारा हा मासा आता उजनीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात पसरत चालला आहे. यामुळे गोड्या पाण्यातले खाण्यासाठी उपयोगात आणत असलेले पारंपरिक मासे संकटात सापडले आहेत.

जाळी फाटण्याचे वाढले प्रमाण
हेलिकॉप्टर मासा हा मूळचा शोभेचा असल्याने अनेक लोक त्याला घरी पाळतात आणि कालांतराने तो मासा जलाशयात सोडला जातो. हा मासा गोड्या पाण्यात सहजपणे वाढतो आणि त्याची संख्या खूप वेगाने वाढते.
जाळ्यांचे नुकसान: या माशांच्या शरीरावर काटेरी शल्क (Scales) असल्यामुळे ते मासेमारीच्या जाळ्यात अडकतात आणि त्यामुळे जाळ्यांचे मोठे नुकसान होते. हेलिकॉप्टर माशांच्या वाढीमुळे जाळी फाटण्याच्या तक्रारी उजनीतील अनेक मच्छीमारांनी केल्या आहेत.

हेही वाचा - Babasaheb Patil on Loan Waiver : 'लोकांना कर्जमाफीचा नाद लागलेला आहे...', अजित पवारांच्या नेत्याचं बळीराजाबद्दल बेताल वक्तव्य

पूर्वी उजनीमध्ये रोहू, मरळ, कटला, वाम, घोगऱ्या, आहेर यांसारखे गोड्या पाण्यातील मासे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. आता तर 'तिलापी' या विदेशी जातीचे प्रमाण जास्त आहे, जी स्थानिक मत्स्य प्रजातींसाठी (Native Fish Species) आधीच धोकादायक ठरली आहे. तिलापी मासा लवकर वाढत असला तरी तो अन्य माशांच्या अन्नसाखळीत हस्तक्षेप करून त्यांच्या वाढीस अडथळा निर्माण करतो. शिवाय, पाण्याच्या विसर्गात मोठ्या प्रमाणात मत्स्यबीज वाहून गेले आहे. त्याचाही फटका बसत आहे.

कोळंबी संवर्धनाची नवी आशा
सध्या उजनी धरणात कोळंबी (Prawns) दिसू लागली आहे, ही मच्छीमारांसाठी एक नवी आणि चांगली आशा आहे. नैसर्गिकरित्या कोळंबीचे वाढणे म्हणजे पाण्याच्या गुणवत्तेत (Water Quality) काही सकारात्मक बदल घडत असल्याचे संकेत आहेत. मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार, जर राज्य सरकारने कोळंबी बीज सोडण्याचे नियोजन केले, तर मत्स्य उत्पादनात मोठी वाढ होईल. कोळंबीला बाजारभावही चांगला मिळत असल्याने मच्छीमारांचे उत्पन्न वाढून आर्थिक स्थैर्य येईल. त्यामुळे मत्स्य संवर्धन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्वतंत्र कोळंबी संवर्धन प्रकल्प राबवावा, अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.

हेही वाचा - New Sand Policy: घर बांधकामाचा खर्च होणार कमी, वाळू धोरणात मोठा बदल, सरकारचा महत्त्वाचा निर्णय


सम्बन्धित सामग्री