ठाणे : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने ठाणे आणि मुलुंडदरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या बांधकामाला तत्त्वतः मंजुरी दिली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही मंजुरी कळवली. प्रस्तावित स्थानकामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक अधिक कार्यक्षम आणि गतिमान होईल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर केला. हे नवीन स्थानक घोडबंदर, पोखरण रोड आणि वागळे इस्टेट परिसरातील प्रवाशांसाठी सोयीचे ठरेल, अशी अपेक्षा आहे. अधिकृत अंदाजानुसार, यामुळे ठाणे आणि मुलुंड स्थानकांवरील गर्दी अनुक्रमे 31 टक्क्यांनी आणि 24 टक्क्यांनी कमी होऊ शकते. सध्या ठाणे स्थानकावरून दररोज सहा लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत असून, या प्रदेशातील सर्वात व्यग्र वाहतूक केंद्रांपैकी एक असलेल्या या स्थानकावरील गर्दी कमी करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
2019 मध्ये संकल्पित केलेला हा प्रकल्प मध्य रेल्वेच्या (सीआर) नेतृत्वाखाली राबवला जाईल आणि ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडद्वारे त्याला अर्थसहाय्य केले जाईल. रेल्वे रुळ आणि प्लॅटफॉर्मसह मुख्य पायाभूत सुविधा विकसित करेल, तर स्मार्ट सिटी संस्था परिसंचरण क्षेत्रातील कामांची अंमलबजावणी करेल. या स्थानकात वाहन पार्किंग, डेक आणि बस टर्मिनल यांसारख्या सुविधांचाही समावेश असणार आहे. सुरुवातीला 120 कोटी रुपये अंदाजित असलेला या प्रकल्पाचा खर्च आता 245 कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Pune Railway Track Crossing : मालगाडीखालून ट्रॅक क्रॉस करताना ट्रेन अचानक सुरु झाली अन्....
हे स्टेशन 14.83 एकरच्या भूखंडावर उभारले जाईल. जो मूळतः ठाणे मनोरुग्णालयासाठी राखून ठेवण्यात आला होता. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर 2023 मध्ये रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात आला होता. स्मार्ट सिटी संस्थेकडील निधीच्या कमतरतेमुळे या प्रकल्पाला विलंब झाला होता. त्यानंतर, ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे आर्थिक मदतीची मागणी केली. जी प्राधिकरणाने मंजूर केली. मार्च 2026 मध्ये, ठाणे महानगरपालिकेने दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या नावाने स्टेशनचे नामकरण करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. मंजुरी मिळाल्यानंतर, काम सुरू करण्यासाठी अंतिम परवानगी मागण्यापूर्वी, सीआर सुधारित खर्चाच्या अंदाजासह एक सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणार आहे.
दरम्यान, नवीन रेल्वे स्थानकांच्या मंजुरीबाबत खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, ही नवीन मागणी नाही. सातत्याने ठाणेकर नागरिकांची इच्छा आहे की, या ठिकाणी नवीन ठाणे रेल्वे स्टेशन व्हावे, या ठिकाणी दोन्ही बाजूचं काम पूर्ण झाले आहे. हे रेल्वे स्टेशन मध्य रेल्वेकडून बांधण्यात येणार आहे. परंतु याचा खर्च महानगरपालिकांनी उचलावा, अशा पद्धतीने पालिकेने मान्य केले होते. या स्थानकाच्या कनेक्टिव्हिटीची दोन्ही बाजूची कामं पूर्ण झालेली आहे. सध्या आता केबलिंगचं काम सुरू आहे. त्यासोबत त्या ठिकाणी पुलांची कामंही सुरू आहेत. फक्त जे काही रेल्वे स्टेशनचं काम आहे. ते आता लवकरात लवकर सुरू होईल, असे म्हस्के यांनी नमूद केले.