मुंबई: भारतात डिजिटल व्यवहारांचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. आता या सुविधेला आणखी एक नवीन विस्तार मिळाला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. आता UPI पेमेंट करताना पिन नंबर टाकण्याची आवश्यकता राहणार नाही. त्याऐवजी, वापरकर्ते फिंगरप्रिंट आणि फेस आयडी वापरून सहज आणि सुरक्षितरीत्या पेमेंट करू शकतील.
हे नवीन वैशिष्ट्य विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि वारंवार व्यवहार करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरेल, कारण अनेकदा पिन लक्षात न ठेवल्यामुळे किंवा चुकीचा पिन टाकल्यामुळे व्यवहार अयशस्वी होण्याच्या समस्या उद्भवत होत्या. आता या सर्व समस्यांवर बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनमुळे तोडगा मिळणार आहे. तसेच, पिनशी संबंधित फसवणूकही रोखली जाण्याची शक्यता आहे.
फिंगरप्रिंट वापरून UPI पेमेंट कसे करावे?
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुमचे UPI अॅप अपडेट करा. नंतर अॅपच्या सेटिंग्ज किंवा प्रोफाइल विभागात जा आणि “बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन” हा पर्याय निवडा. तिथे तुम्हाला 'UPI पेमेंटसाठी फेस अनलॉक' किंवा 'फिंगरप्रिंट वापरा' असे पर्याय मिळतील. ते पर्याय निवडल्यानंतर, तुमचा सध्याचा पिन एकदा एंटर करा आणि खात्री करा. मात्र, पेमेंट करताना, नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू करा आणि रक्कम एंटर करा. त्यानंतर, 'योमेट्रिक वापरा' हा पर्याय निवडा आणि तुमचे बोट फोनच्या फिंगरप्रिंट सेन्सरवर ठेवा. लगेचच पेमेंट पूर्ण होईल.
फेस आयडी वापरून पेमेंट कसे करावे?
फेस आयडी वापरण्याची प्रक्रिया देखील सोपी आहे. पेमेंट सुरू केल्यानंतर आणि रक्कम एंटर केल्यानंतर, 'फेस आयडी वापरा' हा पर्याय निवडा. मग फोनच्या फ्रंट कॅमेराकडे पहा. यानंतर, काही सेकंदांतच तुमचे पेमेंट पूर्ण होईल.
हेही वाचा: Google Chrome Warning: गुगल क्रोम यूजर्ससाठी धोक्याची घंटा! एका क्लिकने होऊ शकतो डेटा चोरी आणि सिस्टिम हॅक
जगात डिजीटल पेमेंटमध्ये भारत आघाडीवर
15 ऑक्टोबर 2025 रोजी आयआयटी धारवाड येथे 'धरती बायोनेस्ट इक्युबेशन सेंटर'च्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अर्थमंत्री मिर्मला सीतारामन यांनी डिजीटल पेमेंटबाबत महत्त्वाची माहिती दिली. 'भारतात डिजिटल पेमेंट पद्धतींचा वापर तब्बल 87 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो जागतिक सरासरीपेक्षा (60%) जास्त आहे', अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
यासह, निर्मला सीतारामन म्हणाल्या की, 'ही फिनटेक क्रांतिची पातळी दर्शवते. भारत देश हा जगात डिजिटल व्यवहारांच्या क्षेत्रात अग्रगण्य ठरला आहे'. देशातील युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) हे या यशाचे प्रमुख कारण ठरले असून, 2024-2025 या आर्थिक वर्षांत तब्बल 261 ट्रिलियन रुपयांचे 18 हजार 580 कोटी व्यवहार यामार्फत झाले आहेत.
पुढे सीतारामन म्हणाल्या की, 'आधार, युपीआय आणि डिजीलॉकर यांसारख्या मजबूत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमुळे लाखो लोक औपचारिक वित्तीय व्यवस्थेत आले आहेत. डिजिटल पेमेंट आता फक्त शहरांपुरते मर्यादित राहिले नाही, तर टायर-2 आणि टायर-3 शहरांमध्येही वेगाने लोकप्रिय होत आहे'.