America Tariffs on Bangladesh Textile : भारत आणि अमेरिका यांच्यात ऐतिहासिक व्यापार करार झाल्याच्या अवघ्या 3 दिवसांतच अमेरिकेने बांगलादेशसोबतही मोठा करार जाहीर करून भारताची चिंता वाढवली आहे. अमेरिकेने भारतासाठी टॅरिफ 25% वरून 18% पर्यंत कमी केला खरा.. परंतु, बांगलादेशला विशिष्ट अटींवर चक्क 'शून्य टॅरिफ'ची (Zero Tariff) सवलत देऊन भारताच्या कापड उद्योगासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. या बातमीमुळे भारतीय शेअर बाजारात कापड कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली.
भारतीय कापड कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले
अमेरिकेच्या या निर्णयाचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. बांगलादेशला मिळालेल्या सवलतीमुळे भारतीय कापड उत्पादक जागतिक स्पर्धेत मागे पडतील, या भीतीने गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला.
Gokaldas Exports: शेअर्समध्ये 5% हून अधिक घसरण होऊन तो 796.45 रुपयांवर आला.
KPR Mills & Arvind: यांच्या शेअर्समध्ये 4% हून अधिक घसरण झाली.
Pearl Global Industries: या कंपनीचा शेअर 3.5% नी खाली आला. तिरुपूर, सुरत आणि पानिपत सारख्या मोठ्या कापड केंद्रांमधील उद्योजकांमध्ये आता चिंतेचे वातावरण पसरले आहे.
बांगलादेशला 'झिरो टॅरिफ'चा फायदा कसा?
अमेरिकेने बांगलादेशसोबत केलेल्या करारानुसार, जर बांगलादेशने अमेरिकन कापूस किंवा मानवनिर्मित फायबर वापरून कपड्यांची निर्मिती केली, तर त्या कापडांच्या आयातीवर अमेरिका एकही रुपया टॅरिफ आकारणार नाही. बांगलादेशचे अंतरिम सरकार प्रमुख मोहम्मद युनूस यांनी या कराराचे स्वागत केले असून, यामुळे बांगलादेशची वस्त्रोद्योग निर्यात गगनाला भिडणार आहे. बांगलादेश सध्या अमेरिकेकडून 250 दशलक्ष डॉलर्सचा कापूस आयात करतो, तर भारत 200 दशलक्ष डॉलर्सचा कापूस आयात करतो. अवघ्या 50 दशलक्ष डॉलर्सच्या फरकामुळे बांगलादेशला शून्य टॅरिफ मिळत आहे, तर भारताला 18% टॅरिफ भरावा लागत आहे.
हेही वाचा - India Russia TradeDeal: भारताने रशियाकडून तेल खरेदी का घटवली? ट्रम्प यांच्या टॅरिफच्या भीतीपेक्षाही 'हे' मोठं कारण ठरलं निर्णायक
मोदी-ट्रम्प मैत्री आणि विरोधाची टीका
विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "मोदींना मित्र म्हणवणाऱ्या ट्रम्प यांनी बांगलादेशला झुकते माप देऊन भारताच्या पाठीत खंजीर खुपसला आहे," अशी टीका विरोधकांकडून होत आहे. भारताने पुढील 5 वर्षांत अमेरिकेकडून 500 अब्ज डॉलर्सची खरेदी करण्याचे आश्वासन दिले असतानाही, अमेरिकेने भारताला 18% टॅरिफच्या कक्षेत ठेवले आहे. यामुळे भारतीय कापड उत्पादकांना बांगलादेशच्या तुलनेत खर्चात मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.
व्यापार युद्धाचा भारतावर परिणाम
या नव्या करारामुळे भारताचा जो आधीचा कर लाभ होता, तो आता पूर्णपणे संपुष्टात आला आहे. कापड क्षेत्रात भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात मोठी स्पर्धा असते. भारतासाठी जमेची बाजू इतकीच आहे की, भारताचा टॅरिफ बांगलादेशच्या सर्वसाधारण 19% टॅरिफपेक्षा 1% ने कमी आहे. मात्र, 'झिरो टॅरिफ'च्या खिडकीमुळे बांगलादेश आता अमेरिकन बाजारपेठेत वर्चस्व गाजवणार हे स्पष्ट दिसत आहे. भारतीय निर्यातदारांना आता अमेरिकन बाजारात टिकून राहण्यासाठी आपल्या किमतीत मोठी कपात करावी लागण्याची शक्यता आहे.
अमेरिकेचे खायचे दात वेगळे अन् दाखवायचे वेगळे..
अमेरिकेने जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या या परिस्थितीचा येत्या काळात भारताला मोठा फटका बसणार आहे, हे आता स्पष्ट दिसत आहे. अमेरिकेने भारतासोबत व्यापार करार करताना स्वतःच्या पदरात सर्व फायदा ओढून घेतला आणि भारताच्या तोंडाला मात्र पाने पुसली आहेत, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तसेच, भारताने अमेरिकेशी कोणतीही वाटाघाटी करताना अधिक सावध राहण्याची गरज येत्या काळात आणखी वाढणार आहे, हे निश्चित.
हेही वाचा - India-US Deal : भारतीय व्यापाऱ्यांना अमेरिकडून 'पेनल्टी टॅरिफ' परत मिळणार? कशी मिळू शकते ही रक्कम?