US Oil Exports Record 2026 : इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे जगासमोर मोठे ऊर्जा संकट उभे ठाकले असतानाच, अमेरिकेने तेल बाजारात आपला दबदबा निर्माण केला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे तब्बल 80 वर्षांनी अमेरिका जागतिक तेल निर्यातीत नवा विक्रम प्रस्थापित करण्याच्या जवळ पोहोचली आहे. आखाती देशांमधील तणावामुळे होणारा पुरवठा खंडित झाल्याचा फायदा घेत, अमेरिकेने स्वतःला जगातील सर्वात मोठा तेल पुरवठादार म्हणून सिद्ध केले आहे.
युद्धाचा परिणाम आणि 'सेल्फ गोल'
अमेरिका आणि इस्रायलचा इराणसोबतचा वाद विकोपाला गेल्याने होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारा व्यापार विसकळीत झाला आहे. इराणने पुरवठा रोखण्याची धमकी दिल्याने युरोप आणि आशियाई देशांनी सुरक्षित पर्यायासाठी अमेरिकेकडे धाव घेतली. विशेष म्हणजे, ज्या इराण आणि रशियावर निर्बंध लादले होते, तेच निर्बंध राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ऊर्जा संकट टाळण्यासाठी शिथिल करावे लागले आहेत.
महत्त्वाची आकडेवारी आणि निर्यातीचा वेग
एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या सरकारी आकडेवारीनुसार, अमेरिकेच्या तेल निर्यातीने गेल्या काही महिन्यांतील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.
- दैनिक निर्यात: गेल्या आठवड्यात अमेरिकेने दररोज सुमारे 5.2 कोटी बॅरल कच्च्या तेलाची निर्यात केली आहे.
- आयात-निर्यात तफावत: सध्या ही तफावत दररोज केवळ 66000 बॅरल इतकीच उरली आहे.
- नवा विक्रम: 1943 नंतर प्रथमच अमेरिका 'नेट एक्सपोर्टर' (निव्वळ निर्यातदार) बनण्याच्या उंबरठ्यावर आहे.
- जागतिक वाटा: होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारा जगातील 20% व्यापार विस्कळीत झाल्याचा थेट फायदा अमेरिकेला झाला.
हेही वाचा - South China Sea Dispute: आखाती युद्धानंतर आता फिलिपिन्स-चीन आमनेसामने? होर्मुझनंतर हे मार्ग केले बंद, धाकधुक वाढली
अमेरिकेचे मुख्य ग्राहक देश
जागतिक अशांततेचा फायदा घेत अमेरिकेने युरोप आणि आशियातील बाजारपेठ काबीज केली आहे. गेल्या आठवड्यातील निर्यातीपैकी 47 टक्के तेल युरोपला तर 37 टक्के आशियाला पुरवण्यात आले. यामध्ये नेदरलँड्स, फ्रान्स आणि जर्मनी (युरोप), जपान आणि दक्षिण कोरिया (आशिया), ग्रीस (ज्याने पहिल्यांदाच अमेरिकेकडून तेल खरेदी केले), तुर्की (ज्यासाठी मोठे जहाज रवाना झाले आहे) हे देश प्रमुख ग्राहक ठरले आहेत.
ऊर्जा बाजारातील बदलती समीकरणे
इराण आणि अमेरिका यांच्यात शांती चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता असल्याने सध्या जगाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र, या युद्धाच्या वणव्यात अमेरिकेने आपला आर्थिक नफा मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश बनलेल्या अमेरिकेची मागणी युरोपीय देशांमध्ये लक्षणीयरीत्या वाढली असून, आगामी काळात अमेरिका तेल राजकारणातील सर्वात मोठा 'किंग' म्हणून समोर येईल, अशी चिन्हे दिसत आहेत.
हेही वाचा - US Sanctions Russian Oil : भारताच्या स्वस्त तेल खरेदीला ब्रेक? रशिया-इराणकडून आयातीसाठी अमेरिकेची सवलत संपली; बसणार आर्थिक फटका