Gold Rates Hike Indicates World Economy is in Danger : झोहो कॉर्पोरेशनचे (Zoho Corporation) संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी जागतिक बाजारातील वाढत्या अस्थिरतेवर आणि सोन्याच्या दरातील विक्रमी वाढीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. सोन्याची वाढती किंमत ही केवळ गुंतवणूकदारांची उत्सुकता नसून, जागतिक आर्थिक व्यवस्थेसाठी धोक्याचा मोठा इशारा असल्याचे वेम्बू म्हणाले आहेत.
अमेरिकेचा शेअर बाजार ‘बुडबुड्या’त
वेम्बू यांनी एका वृत्तसंस्थेने प्रकाशित झालेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) उपव्यवस्थापकीय संचालक डॉ. गीता गोपीनाथ यांच्या लेखावर प्रतिक्रिया देताना आपले मत मांडले. डॉ. गोपीनाथ यांनी अमेरिकन इक्विटीज धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या असून, जर अमेरिकेचा शेअर बाजार कोसळला, तर मोठे नुकसान होईल, असे मत व्यक्त केले होते.
श्रीधर वेम्बू यांनी या मताचे समर्थन करत म्हटले, “मी डॉ. गीता गोपीनाथ यांच्याशी पूर्णपणे सहमत आहे. अमेरिकेचा शेअर बाजार एका स्पष्टपणे दिसत असलेल्या आणि विशाल ‘बुडबुड्या’त (Bubble) आहे.” ते पुढे म्हणाले की, आर्टिफीशियल इंटेलिजन्समुळे (AI) उत्साहाने प्रेरित होऊन अमेरिकेचा शेअर बाजार उच्चांकाजवळ फिरत आहे. सध्या सिस्टीममध्ये कर्जाचा (Leverage) स्तर ज्या मर्यादेपर्यंत वाढला आहे, त्यामुळे 2008-09 च्या जागतिक आर्थिक संकटासारखी मोठी घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सोनं म्हणजे गुंतवणूक नाही, तर ‘विमा’
वेम्बू यांनी सोन्याच्या वाढत्या दराकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, "सोन्याच्या वाढत्या दरातून आपल्याला धोक्याचा इशारा मिळत आहे." सोन्याकडे गुंतवणूक म्हणून न पाहता, आर्थिक जोखमीच्या काळातील 'विमा' (Insurance) म्हणून पाहिले गेले पाहिजे. जेव्हा अर्थव्यवस्था किंवा शेअर बाजार धोक्यात असतो, तेव्हा लोक सोन्यातील गुंतवणुकीमुळे सुरक्षित राहू शकतात.
हेही वाचा - Gold Jewellery : हौस इतकी मोठी की.. जगात आतापर्यंत जितकं सोनं खाणीतून बाहेर निघालंय, त्यापैकी इतक्या सोन्याचे फक्त दागिनेच बनलेत!
जागतिक पातळीवर बाजारपेठेचे मूल्यांकन आणि कर्ज वाढत असताना श्रीधर वेम्बू यांची ही टिप्पणी समोर आली आहे. अर्थतज्ज्ञांनी हे अनेकदा लक्षात आणून दिले आहे की, सोन्याच्या वाढत्या किंमती या आत्मविश्वासापेक्षा भीतीचे प्रतिबिंब दाखवतात.
अर्थतज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांचा वित्तीय बाजारावरील विश्वास उडतो किंवा चलनवाढ (Inflation), मंदी (Recession) आणि बँकिंग अस्थिरतेची अपेक्षा असते, तेव्हा सोन्याचे दर वाढतात. स्टॉक किंवा बाँड्ससारख्या कागदी मालमत्ता धोकादायक स्थितीत पोहोचतात, तेव्हा सोने मूल्य जपून ठेवणारी सुरक्षित मालमत्ता म्हणून काम करते. सोन्याच्या किमतीत सतत होणारी वाढ ही बहुतेकदा व्यापक अर्थव्यवस्थेवरील विश्वासाचा अभाव दर्शवते.
सोन्याचा दर लवकरच 1.50 लाख प्रति 10 ग्रॅमवर पोहोचणार?
जागतिक बाजारात वाढलेली अस्थिरता आणि मध्यवर्ती बँकांकडून होत असलेली सोन्याची जोरदार खरेदी यामुळे सोन्याच्या किमतीत मोठी तेजी दिसत आहे. ऑल इंडिया जेम अँड ज्वैलरी डोमेस्टिक कौन्सिल (GJC) चे संस्थापक सदस्य अनंत पद्मनाभन यांच्या अंदाजानुसार, जर चीन-अमेरिका व्यापार चर्चा फिसकटली आणि रशिया-युक्रेन संघर्ष सुरू राहिला, तर येत्या काही महिन्यांत सोन्याच्या किमती 1.50 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी पातळीवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. मात्र, थोडा करेक्शन झाल्यास सोन्याचा भाव तात्पुरता 1.15 लाख रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो, असेही पद्मनाभन यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - Gold Rate Drop: यूएस-चीन तणावाचा परिणाम सोन्याच्या दरावर; सोन्याच्या दरात घट; गुंतवणूकदारांचा कल बदलला