Monday, November 17, 2025 12:54:00 AM

Maharishi Valmiki Jayanti 2025: कोण होते महर्षी वाल्मिकी? 'वाल्याचा वाल्मिकी झाला' ही म्हण कशी पडली?

आश्विन पौर्णिमेला सनातन धर्माचे लोक महर्षी वाल्मिकींचा जन्मोत्सव म्हणून मोठ्या श्रद्धेने साजरा करतात. महर्षी वाल्मिकी यांना संस्कृत भाषेतील पहिले कवी (आदिकवी) म्हणून ओळखले जाते.

maharishi valmiki jayanti 2025 कोण होते महर्षी वाल्मिकी वाल्याचा वाल्मिकी झाला ही म्हण कशी पडली

Maharishi Valmiki Jayanti 2025 : आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला महर्षी वाल्मिकी (Maharishi Valmiki) यांची जयंती साजरी केली जाते. सनातन धर्माचे लोक या दिवशी महर्षी वाल्मिकींचा जन्मोत्सव म्हणून मोठ्या श्रद्धेने साजरा करतात. महर्षी वाल्मिकी यांनीच प्रभू रामचंद्रांचे जीवनचरित्र सांगणाऱ्या 'रामायण' (Ramayana) या महाकाव्याची रचना केली. यावर्षी वाल्मिकी जयंती आज, मंगळवार, 7 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. महर्षी वाल्मिकी यांना संस्कृत भाषेतील पहिले कवी (आदिकवी) म्हणून ओळखले जाते.

डाकू रत्नाकर ते महर्षी वाल्मिकी
पौराणिक कथांनुसार, वाल्मिकींचे सुरुवातीचे नाव रत्नाकर होते आणि त्यांचा जन्म अंगिरा गोत्राच्या ब्राह्मण कुळात झाला होता. मात्र, लहानपणीच रत्नाकरचे अपहरण एका भिल्ल स्त्रीने केले आणि तिनेच त्याचे पालनपोषण केले. भिल्ल लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी लोकांना लुटत असत. त्याच संस्कारांमध्ये लहानाचे मोठे झाल्यामुळे रत्नाकरही मोठेपणी डाकू बनला. तोही लूटमार करू लागला. त्याने वाटमारी करताना हजारो हत्या, बलात्कारही केले. हे सर्व पाप त्याच्या माथी जमा होत होते. मात्र, त्याला याची सुतराम कल्पना नव्हती. हे पाप आहे, हे त्याला माहीत सुद्धा नव्हते. 

एकदा नारद मुनी जंगलातून जात असताना  रत्नाकरने त्यांना घनदाट जंगलात अडवले आणि लुटण्याचा प्रयत्न केला. नारद मुनींनी त्याला विचारले, "तू हे अपराध कशासाठी करत आहेस?" त्यावर रत्नाकर म्हणाला, "याच कामातून माझा आणि माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो." तेव्हा नारदजींनी त्याला कर्माचे महत्त्व समजावले आणि विचारले, "तू हे जे पाप करत आहेस, त्यात तुझे कुटुंब भागीदार व्हायला आणि त्याची शिक्षा भोगण्यास तयार आहे का?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी रत्नाकरने नारद मुनींना एका झाडाला बांधले आणि घरी गेला.

राम-नाम जपाने झाले रत्नाकरचे परिवर्तन
रत्नाकरने कुटुंबातील सदस्यांना विचारले की, 'मी केलेल्या पापात तुम्ही भागीदार होऊन त्याची शिक्षा भोगण्यास तयार आहात का?' तेव्हा कुटुंबातील कोणत्याही सदस्याने त्याच्या पापांमध्ये भागीदार होण्यास नकार दिला. यामुळे रत्नाकरचे मनपरिवर्तन झाले. त्याने परत जंगलात जाऊन नारद मुनींना मुक्त केले आणि त्यांच्याकडे क्षमा मागितली. नारदजींनी त्याला राम-नाम जपण्याचा आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचा उपदेश दिला.

हेही वाचा - Diwali Festival 2025 : यंदा दिवाळी कधी साजरी होणार?; 20 की 21 ऑक्टोबरला, जाणून घ्या

'मरा मरा' उलटे म्हणता। राम प्रकटला जिव्हेवरता।
देवर्षी नारदांच्या उपदेशानुसार रत्नाकर जेव्हा 'राम-राम' जपण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा त्याने केलेल्या असंख्य पापांच्या प्रभावामुळे त्याची जीभ रामनाम उच्चारण्यास असमर्थ ठरत होती आणि त्याच्या मुखातून 'मरा-मरा' हा शब्द बाहेर पडत होता. त्याची ही स्थिती आणि त्याच्या मनात अंकुरलेला पवित्र भाव पाहून नारद मुनींनी त्याला 'मरा-मरा' हाच जप करत राहण्यास सांगितले आणि ते पुढे म्हणाले की, अशाच भावपूर्ण मनाने 'मरा-मरा' म्हणत राहिल्याने सुद्धा तुला श्रीराम नक्की मिळतील.

याच प्रकारे नारद मुनींच्या उपदेशानुसार, त्यांच्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवून रत्नाकर 'मरा-मरा' जप करत राहिला. त्याचे मन श्रीरामांच्या भक्तीत तल्लीन झाले आणि जीभ त्याच्याही नकळत आपोआप रामनाम उच्चारू लागली. राम-नाम जपताना रत्नाकर तपस्येत लीन झाला. त्याची तहान-भूकही हरपली आणि त्याला कशाचेही भान उरले नाही. तो इतके तल्लीन झाले की, त्यांच्या शरीरावर वाळवींनी वारूळ तयार केले, त्याचीही त्याला शुद्ध राहिली नाही. असे किती दिवस, रात्र, महिने आणि वर्षे किती झाली याचा पत्ताही त्याला लागला नाही.

अखेर झाले 'महर्षी वाल्मिकी'
रत्नाकरच्या कठोर तपस्येमुळे प्रसन्न होऊन ब्रह्मदेवांनी त्यांना दर्शन दिले. त्यावेळेस रत्नाकरच्या शरीरावर वाळवींनी तयार केलेला मातीचा डोंगर (वारूळ) होता. वाळवीच्या घराला संस्कृतमध्ये 'वाल्मीक' म्हणतात. म्हणूनच ब्रह्मदेवांनी रत्नाकरला 'वाल्मिकी' हे नाव दिले. तसेच, ब्रह्मदेवांनी महर्षी वाल्मिकी यांना रामायण या महाकाव्याची रचना करण्याची प्रेरणा दिली. अशा प्रकारे, राम-नामाचा जप करत डाकू रत्नाकर हे महर्षी वाल्मिकी बनले आणि त्यांना आदिकवी म्हणून ओळख मिळाली.

हेही वाचा - Pandharpur Kartiki Ekadashi 2025: राज्यात दोन उपमुख्यमंत्री असताना विठ्ठलाची पूजा कोण करणार?मंदिर समिती संभ्रमात

सनातन भारतीय संस्कृतीने सर्व जगासमोर उदाहरण निर्माण केले
'वाल्याचा वाल्मिकी झाला' ही म्हण किंवा 'नराचा नारायण होणे' ही म्हण मानवाला त्याच्या जीवनाचा सर्व प्रकारच्या अभावांपासून सुरुवात करून ते अनंतापर्यंत विकास करण्याची प्रेरणा देते. मनातील पवित्र भाव-भक्तीमुळे मानवी जीवनाचा उत्कर्ष कसा घडून येतो, याचे हे उदाहरण आहे. अत्यंत दुर्जन-दुराचारी व्यक्तीही प्रयासांनी सर्वगुणसंपन्न होऊ शकते, हेच यातून समजते.

वाल्मिकी जयंती देशभरात मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते. वाल्मिकी समुदाय महर्षी वाल्मिकींना देवाचा अवतार मानतो. या जयंतीनिमित्त वाल्मिकी मंदिरे आणि आश्रमे फुलांनी सजवली जातात आणि भाविक 'रामायण'मधील चौपाईंचे पठण करतात.

(Disclaimer : ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. जय महाराष्ट्र यातून कसलाही दावा करत नाही.)


सम्बन्धित सामग्री