वसई : वसईत भररस्त्यात प्रियकराने प्रेयसीची हत्या केली. प्रियकराने २९ वर्षांच्या तरुणीवर पान्याने हल्ला केला. डोक्यावर आणि छातीवर वारंवार पान्याने हल्ला केला. या वारंवार झालेल्या हल्ल्याने तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओत प्रियकर प्रेयसीला उद्देशून 'असं का केलं ? माझ्यासोबत अशी का वागलीस ?' असे प्रश्न हिंदी भाषेत विचारत हल्ला करताना दिसत आहे. ही घटना घडत असताना उपस्थितांनी घाबरून हल्लेखोराला अडवणे टाळले. एका व्यक्तीने प्रयत्न केले पण त्याला इतरांची साथ मिळाली नाही अखेर त्या व्यक्तीने प्रयत्न सोडून दिले. थोड्या वेळाने तरुणीचा मृत्यू झाला.
वसईतील घटनेप्रकरणी गृहमंत्र्यांचे ट्वीट
वसईतील घटनेप्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्वीट केले आहे. 'वसईत एका तरुणीची भररस्त्यात हत्या झाल्याची घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांना या घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून, सखोल तपास करुन, न्यायालयात सुद्धा भक्कम पुराव्यानिशी बाजू मांडून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल, यादृष्टीने निर्देशित करण्यात आले आहे.' असे ट्वीट फडणवीस यांनी केले आहे.