Monday, March 09, 2026 09:24:27 PM

Warren Buffett : वॉरेन बफेट यांचा मोठा निर्णय, अ‍ॅमेझॉनमधील 77 टक्के हिस्सा विकला; मीडिया क्षेत्रात पुन्हा एन्ट्री

2025 च्या चौथ्या तिमाहीत बर्कशायर हॅथवेने ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अ‍ॅमेझॉनमधील 77 टक्के हिस्सा विकून टाकल्याचे समोर आले आहे.

warren buffett  वॉरेन बफेट यांचा मोठा निर्णय अ‍ॅमेझॉनमधील 77 टक्के हिस्सा विकला मीडिया क्षेत्रात पुन्हा एन्ट्री

Warren Buffett : जगातील सर्वात दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांच्या 'बर्कशायर हॅथवे' या कंपनीने जागतिक बाजारपेठेत मोठे फेरबदल केले आहेत. 2025 च्या चौथ्या तिमाहीत बर्कशायर हॅथवेने ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अ‍ॅमेझॉनमधील 77 टक्के हिस्सा विकून टाकल्याचे समोर आले आहे. सुमारे 1.7 अब्ज डॉलर्सच्या शेअर्सची ही विक्री अशा वेळी झाली आहे, जेव्हा अ‍ॅमेझॉनच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत होती.

अ‍ॅमेझॉनच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घट
बफेट यांनी हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला तेव्हा अ‍ॅमेझॉनचे मार्केट व्हॅल्यू सलग 9 दिवस घसरल्याने तब्बल 410 अब्ज डॉलर्सनी कमी झाले होते. मात्र, मंगळवारी बाजार बंद होताना अ‍ॅमेझॉनच्या शेअरमध्ये 1.19 टक्केची सुधारणा दिसून आली. अ‍ॅमेझॉनसोबतच बफेट यांनी टेक दिग्गज अ‍ॅपल (Apple) मधील आपला 4 टक्के हिस्सा (2.7 अब्ज डॉलर्स) देखील कमी केला आहे.

मीडिया क्षेत्रात पुन्हा 'इनिंग' सुरू
सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे, 2020 मध्ये वृत्तपत्र व्यवसाय विकून मीडिया क्षेत्रातून बाहेर पडलेल्या वॉरेन बफेट यांनी पुन्हा या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. बर्कशायर हॅथवेने 'द न्यू यॉर्क टाइम्स' मध्ये गुंतवणूक करून सर्वांनाच चकित केले आहे. 2025 च्या अखेरीस, बफेट यांच्या कंपनीकडे द न्यू यॉर्क टाइम्सचे 5.07 दशलक्ष शेअर्स असून त्यांचे मूल्य अंदाजे 351.7 दशलक्ष डॉलर्स इतके आहे.

हेही वाचा - India-Russia Trade : रशियन तेलाला भारताचा 'खो'; जानेवारीत आयातीत 40 टक्क्यांची मोठी घट, आता 'हा' देश ठरणार नवा जोडीदार

नेतृत्वात बदल आणि सर्वात मोठी होल्डिंग्ज
बर्कशायर हॅथवेमध्ये नुकतेच नेतृत्वाचे मोठे बदल झाले आहेत. 1 जानेवारीपासून ग्रेग एबेल यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत, तर वॉरेन बफेट यांनी अध्यक्षपद कायम ठेवले आहे. डिसेंबर अखेरच्या आकडेवारीनुसार, बर्कशायर हॅथवेची सर्वात मोठी गुंतवणूक अ‍ॅपलमध्ये (22.60 टक्के) आहे, ज्याचे मूल्य 62 अब्ज डॉलर्स आहे. याशिवाय अमेरिकन एक्सप्रेस, बँक ऑफ अमेरिका, कोका-कोला आणि शेवरॉन कॉर्प या कंपन्यांमध्येही बफेट यांची मोठी होल्डिंग्ज कायम आहेत.
 


सम्बन्धित सामग्री