छत्रपती संभाजीनगर : पावसाळा लागून तब्बल महिना उलटला आहे तरी देखील मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाचे प्रतिक्षा कायम आहे. मागील ३ ते ४ दिवसांपासून झालेल्या पावसामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र अद्यापही मराठवाड्यात तब्बल १ हजार ५४५ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मागील तीन दिवसात मराठवाड्यातील तब्बल १ हजार ८५ टँकर बंद करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने विभागात दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळाली. विहिरी आणि बोरवेलचे पाणी आटले होते. अनेक धरणे कोरडेठाक पडले होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनला होता. अशात प्रशासनाकडून गाव तांड्यावर टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. जून महिन्यात देखील मराठवाड्यात १ हजार 545 टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. अशात गेल्या चार-पाच दिवसांत मराठवाड्यातील अनेक भागात दमदार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी नद्या नाल्यांना पूर आला असून विहिरी देखील भरल्या आहे. या भागातील पाणी प्रश्न सुटल्याने प्रशासनाने टँकर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.