मुंबई : घाटकोपर येथील महाकाय फलक दुर्घटनेनंतर ठाणे महानगरपालिकेनेही शहर हद्दीतील बेकायदा महाकाय फलकांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली होती. मात्र, महापालिकेने नेमकी काय आणि किती फलकांवर कारवाई केली ? हे कुठेही स्पष्ट केलेले नाही. ठाणे महापालिका हद्दीतील बेकायदा ४९ महाकाय फलकांवर काय कारवाई केली ? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला केली. तसेच, त्यावर सोमवारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत परवानगी नसताना अद्यापही बरेचसे फलक अनेक रस्ते, पदपथ, बस थांबे याठिकाणी लावलेले दिसत असल्याबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली.